Manoj Jarange-Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil: माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज जरांगेंची तोफ धडाडणार...

Maratha reservation : अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला नांदेड जिल्ह्यातील लाखो समाज बांधव उपस्थित होते.

Mangesh Mahale

लक्ष्मीकांत मुळे

Nanded : मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विविध भागात दौरे करून सभांचा झंझावात सुरू केला आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील बारड (ता मुदखेड) येथे आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपत येत आहे. प्रशासनाच्या वतीने कुणबी नोंदणीचे युध्दपातळीवर काम सुरू आहे.सकल‌ मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी लढा तीव्र करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मार्गांनी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. गावबंदीचा फटका खासदार, आमदार, मंत्र्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे.

या सभेसाठी भोकर, मुदखेड , अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या तरूणांच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या सभांना अभुतपुर्व व उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला नांदेड जिल्ह्यातील लाखो समाज बांधव उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच वाढला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मंत्री छगन भुजबळ हे हिंगोली येथे सभेला जात असताना पिंपळगाव पाटी जवळ सकल मराठा समाजाच्या तरूणांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता.नांदेड जिल्ह्यात उद्या (शुक्रवारी) मनोज जरांगे पाटील यांच्या चार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.या सभांचीही जय्यत तयारी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT