Ashok Chavan-Amar Rajurkar News Sarkarnama
मराठवाडा

Nanded MLC: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच शब्द अंतिम; अमर राजूरकर तिसऱ्यांदा विधान परिषदेत

Ashok Chavan, Amar Rajurkar, Nanded MLC Election: नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अमर राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. अशोक चव्हाण यांच्या रणनीतीमुळे महायुती एकसंध राहिली आणि विरोधकांचे गणित कोलमडले.

Jagdish Pansare

Nanded MLC Election: नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी अमर राजुरकर यांच्यासाठी एक हाती विजय खेचून आणला आहे. अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याचा सूर आळवला गेला मात्र अशोक चव्हाण यांनी परफेक्ट प्लॅनिंग करून अमर राजूरकर यांना तिसऱ्यांदा आमदार करण्याची किमया साधली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत वर्चस्व सिद्ध केले होते. ज्या महापालिकेत गेल्या कित्येक वर्षात भाजपाला प्रवेशही करता आला नाही त्या भाजपच्या ताब्यात आज बहुमतासह महापालिकेची सत्ता आहे. हा चमत्कार अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर घडला. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण सांगतील तोच अंतिम शब्द काँग्रेस प्रमाणे भाजपमध्ये ठरू लागला.

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली तेव्हा नांदेड मधून अमर राजूरकर यांचे एकमेव नाव अशोक चव्हाण यांच्याकडून पुढे केले गेले. पक्षश्रेष्ठींनीही त्यावर शिक्कामोर्तब करत अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला. महाविकास आघाडीने भाजपमधूनच पक्षात आलेल्या रामदास सुमठाणकर यांना उमेदवारी देत महायुतीला आव्हान दिले होते. मात्र हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ऐनवेळी सूत्रे हलवत आपले पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेसच्या नेत्यांना भाग पाडले. नागेश पाटील आष्टीकर यांनी आमच्याकडे मॅजिक फिगर आहे आमचा विजय शंभर टक्के होणार, नांदेडच्या शेअर बाजारात आम्ही बूम करण्यासाठी आलो आहोत असा दावाही केला. यावर अशोक चव्हाण यांनी फारसे भाष्य न करता अत्यंत शांतपणे महायुतीची मतं फुटणार नाहीत ती एकत्र राहतील याची पुरेपूर काळजी घेतली. निवडणूक प्रचार यंत्रणा राबवण्यात अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचा हातखंडा आणि प्रदीर्घ अनुभव असल्याने महायुतीचे अनेक नगरसेवक सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते.

दुसरीकडे राज्यात झालेल्या ऑपरेशन टायगरमध्ये हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली. रामदास सुमठाणकर यांना ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यामुळे काँग्रेसमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण होते. नागेश पाटील आष्टीकर यांचा ऑपरेशन टायगर मधील सहभाग आणि काँग्रेसच्या नाराजीचा फटका नागेश पाटील आष्टीकर यांना बसल्याचे दिसते कारण महाविकास आघाडीकडे असलेल्या मतांपेक्षाही कमी मते त्यांना मिळाली. एकट्या काँग्रेसकडे ९२ मते होती मात्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ पहिल्या पसंतीची मते मिळाली. यावरून महाविकास आघाडीचे मते फुटल्याचे स्पष्ट होते. अमरनाथ राजूरकर यांना पहिल्या पसंतीची ३३९ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली.

एकीकडे महाविकास आघाडीची मते फुटली तर दुसरीकडे महायुती मात्र अभेद्य राहिली. अमर राजूरकर यांच्या उमेदवारीनंतर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये नाराजीचा सूर होता. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेतील बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम हे तीन आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत होते तर हेमंत पाटील हे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते.

महायुतीतील या दोन पक्षांमधील नाराजी वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी आपापल्या पक्षातील नेत्यांना योग्य संदेश देत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. वरिष्ठांचे आदेश मानत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी आपली उपद्रव्यशक्ती न वापरता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली परिणामी अमर राजूरकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे सांगत निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या विरोधाला फारसे महत्त्व निवडणुकीत उरले नाही कारण त्यांच्याकडे संख्याबळच नव्हते.

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राखत अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाने चव्हाण यांची नांदेड वरील पकड अधिक मजबूत झाली असून राज्य आणि केंद्रातही त्यांचे वजन आणखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT