Ashok Chavan News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : माझा मेटे करा, अशा चर्चा सध्या सुरू आहेत, चव्हाणांचा खळबळजनक आरोप..

Marathwada : राजकारणाची पातळी खालवत चालली असून माझा विनायक मेटे करा, अशी चर्चा होत असेल तर हे गंभीर आहे

सरकारनामा ब्युरो

Nanded : माझ्या मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचा गैरवापर सुरू आहे. सही कायम ठेवून त्यातला मजकूर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. बनावट लेटरहेड फिरवून मी मराठा समाजाच्या विरोधात आहे, असा संभ्रम निर्माण करण्याचा गलिच्छ प्रकार सुरू आहे. एवढेच नाही, तर याचा मेटे करा, अशा चर्चा देखील केल्या जातायेत असा, खळबळजनक आरोप माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अर्धापूर येथील एका कार्यक्रमात बोलतांना केला.

अशोक चव्हाण यांनी दुपारीच नांदेडच्या अतिरक्त पोलिस अधिक्षकांची भेट घेवून लेखी तक्रार दिली. यात त्यांनी आपल्याबाबतीत घातपात होण्याची शक्यता वर्तवली होती. (Nanded) त्यानंतर अर्धापूर येथे बोलतांना त्यांनी पुन्हा कार्यक्रमाला झालेल्या उशीराबद्दल सांगताना या प्रकरणाचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर याचा विनायक मेटे (Vinayak Mete) करा, अशा प्रकारच्या चर्चा देखील केल्या जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला.

चव्हाण म्हणाले, मला आज इथे यायला एक तास उशीर झाला, कारण मी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार द्यायला गेलो होतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहेत. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते.

त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.

ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले जात आहेत. माझ्यावर मुंबई आणि नांदेडमध्ये पाळत ठेवली जाते आहे. माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता आहे.

आतापर्यंतच्या इतिहासात असे गलिच्छ राजकारण कधी जिल्ह्यात घडले नव्हते. विरोध करा पण, इतक्या खालच्या पातळीला जावू नका. माझ्यावर राग काढण्यापेक्षा तुमच्या बहिणीला काय बोलावे काय नाही हे सांगा ना? असे म्हणत चव्हाणांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. राजकारणाची पातळी खालवत चालली असून माझा विनायक मेटे करा, अशी चर्चा होत असेल तर हे गंभीर आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT