Ashok Chavan on Rahul Gandhi Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : सोनिया गांधींसमोर तुम्ही रडला नसाल ? अशोकराव तुमची काय गॅरंटी..

Jagdish Pansare

Chhatrapti Sambhajinagar News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होती. त्यावेळी अगदी सगळे चव्हाण कुटुंबच या यात्रेच्या तयारीत झोकून देऊन काम करत होते. नांदेडमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी त्याबद्दल अशोक चव्हाण यांचे तोंडभरून कौतुकही केले. त्याच अशोक चव्हाण यांच्यावर काल मुंबईत झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत गांधी यांनी टीका केली.

चार दशके काँग्रेसमध्ये राजकारण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, प्रदेश आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपच्या ज्या विचारसरणीच्या विरोधात अशोक चव्हाणांनी चाळीस वर्षांहून अधिक राजकारण केले, सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवली तोच भाजप पक्ष आता त्यांना योग्य वाटू लागला. मोदींच्या गॅरंटीवर नाही, तर काँग्रेसवर देशातील जनतेचा विश्वास आहे, असे सांगणारे अशोक चव्हाण आता मोदी गॅरंटीच कशी चालणार हे सांगत आहेत. (Ashok Chavan News)

राहुल गांधी यांनी कालच्या आपल्या भाषणात अशोक चव्हाण यांचे नाव न घेता, 'काँग्रेस का एक बडा नेता भाजपा मे जाने से पहेले मेरी माँ के पास आके रोया था', अशी टीका केली. यावर लगोलग अशोक चव्हाण यांनी खुलासा करत आपण भाजपमध्ये जाणार हे कोणालाही माहीत नव्हते, सोनिया गांधी यांना आपण भेटलोही नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी ते विधान माझ्या बाबतीत केले असेल तर ते तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली.

त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अशोक चव्हाणांवर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून सुरू होती. भाजपच्या नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा आपल्या भाषणातून तसा दावाही केला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सातत्याने नांदेडमध्ये भूकंप होणार असे सांगत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाला हवा दिली. पण अशोक चव्हाण यांनी मात्र वेळोवेळी साळसुदपणाचा आव आणत, या चर्चा म्हणजे अफवा, धूळफेक, दिशाभूल असल्याचे छातीठोकपणे सांगितले.

आपले समर्थक माजी आमदार अमर राजूकर यांच्या माध्यमातून चव्हाण यांनी सातत्याने भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल केलेली विधानं, चर्चा खऱ्या ठरल्या. पण या प्रवेशाबद्दल त्यांनी पाळलेली गुप्तता कमालीची होती, हे मान्य करावेच लागेल. कारण काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देईपर्यंत त्यांनी याची खबर कोणालाही लागू दिली नव्हती.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुंबईच्या सभेत अशोक चव्हाण यांना उद्देशून लगावलेला टोला आणि केलेली टीका खोटी असेल, असं कुणी मानायला तयार नाही. कारण अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर विश्वास ठेवण्यास आता कुणी धजावायला तयार नाही. भाजप प्रवेशाच्या चर्चा जशा चव्हाण नाकारत होते, तसेच आता ते सोनिया गांधींजवळ जाऊन ते रडले नाहीत, हा त्यांचा खुलासाही कोणी स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे हिंदीतील म्हण जो हौदसे गई वो बूंद से नही आती, हे चव्हाणांच्या बाबतीत खरेच म्हणावे लागेल.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT