BJP News : उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती कदाचित त्यांच्या खासदारांना आवडत नसेल, म्हणून ते भाजपामध्ये जात आहेत. नेमकं काय झालं हे मला माहित नाही. पण विरोधी पक्षाकडे आता नेतृत्वच उरलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाला इथे आपले आता भवितव्य नाही, असे वाटू लागले आहे, म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये तृणमल काँग्रेसचे व महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार, आमदार त्यांना सोडून जात आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
नांदेड व लातूर-बीड-धाराशीव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला अशोक चव्हाण यांनी दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या नगरसवेकांची बैठक घेतली. महायुतीचे राज्यातील व मराठवाड्यातील सर्व उमेदवार निवडून येतील, असे सांगतानाच विरोधकांसह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांना फोडण्यासाठी भाजपाने पैशाचा वापर केला, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यावर पृथ्वीराज चव्हाण हे अनुभवी आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असते, त्यामुळेच कदाचित त्यांनी आरोप केला असावा असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. राजकारणात आरोप-प्रत्यारोप करणं हा एक भाग झाला आहे. घोडेबाजार झाला हा आरोप करणं ठीक आहे, पण ते सिद्ध करावे लागेल. कोणावरही कुठलाही दबाव नाही, सगळे नगरसेवक मोकळे फिरत आहेत, असेही अशोक चव्हाण म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावर विरोधकांकडे नेतृत्वच राहिलेले नाही, अशावेळी प्रत्येकाला आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये हे दिसून आले.आज तृणमल काँग्रेसचे खासदार, आमदार पक्ष सोडून बाहेर पडत आहे. आपले राजकीय भविष्य त्या पक्षात सुरक्षित नाही, हे लक्षात येत असल्यानेच पश्चिम बंगालमधील आमदार, खासदार हे भाजपामध्ये दाखल होत आहेत.
ती परिस्थिती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची होऊ लागली आहे. ठाकरेंच्या खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षित राजकीय भवितव्यासाठी ते भाजपामध्ये येत आहेत, असा दावाही अशोक चव्हाण यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.