Bharat Jodo Rally in Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Rally in Maharashtra News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : राहुल गांधी तुमचे प्रश्न सोडवायला निघालेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा..

Jagdish Pansare

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन राहुल गाधी महाराष्ट्रात निघाले आहेत. दिवंगत इंदिराजी, राजीवजी यांचा जसा लोकांशी स्नहे, संपर्क होता, तसाच राहुल गांधी यांचा देखील आहे. लोकशाही टिकावी, देश वाचावा यासाठी त्यांनी ही भारत जोडो यात्रा काढली आहे. सर्वसामान्य, गोरगरिब, कष्टकरी, तरुण, शेतकरी, विद्यार्थी, महिला अशा सगळ्या समाज घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते चालतायेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड येथे भारत जोडोच्या निमित्ताने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. वैचारिक भूमिकेपेक्षा वैयक्तिक शत्रुत्व वाढवले जात आहे. एकमेकांचे गळे कापण्याचे, संपवण्याचे काम सुरू आहे. (Ashok Chavan) अशाने लोकशाही शिल्लक राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात आज चौथा दिवस होता. या निमित्ताने राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, डोळ्याच पारणं फिटावं अशी ही सभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात निघाले आहेत. गरीबांचे अश्रू पुसण्याचे काम जनसंवादच्या माध्यमातून ते करत आहेत. इंदिराजी, राजीवजी यांच्या प्रमाणेच राहुल गांधी हे देखील लोकांशी कनेक्ट आहेत. समाजाचे सगळे घटक राहुल गांधींना भेटले, त्यांना आशिर्वाद दिले. या निमित्ताने सगळा मराठवाडा एकवटला आहे. प्रवास खडतर आहे, आव्हान मोठे आव्हान आहे पण या सगळ्याशी तोंड देण्यासाठी राहुल गांधी समर्थ आहेत.

लोकशाही धोक्यात आहे ही प्रत्येकाची भावना बनली आहे. संविधानाची तत्व शिल्लक राहतील की नाही? यांची भिती प्रत्येकाला वाटू लागली आहे. प्रत्येक समाज भयभीत आहे, माध्यमांवर देखील बंधने आहेत. अशावेळी नितिन गडकरी यांनी मनमोहन सिंगाची आठवण काढली. काॅंग्रेसच्या नेतृत्वाची प्रशंसा सगळे करतात, असेही चव्हाण म्हणाले. वैचारिक भूमिकेपेक्षा वैयक्तिक शत्रुत्व वाढवले जात आहे. एकमेकांचे गळे कापण्याचे, संपवण्याचे काम सुरू आहे. अशाने लोकशाही शिल्लक राहणार नाही, असे सांगतानांच त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटलांची आठवण काढली.

आर.आर. पाटलांनी गावात तंटामुक्ती केली. आता गावातले तंटे संपले, पण देशातील तंट कसे मिटणार असा सवाल चव्हाण यांनी उपस्थितीत केला. सामान्य माणसांमध्ये राजकारण्यांबद्दल घृणा निर्माण होत आहे. देशात गलिच्छ राजकारण सुरू असून अशा वातावरणात लोकशाही टिकवण्याचे काम करावे लागेल. त्यासाठीच हा भारत जोडोचा कार्यक्रम. लोकशाही टिकवायची, देश वाचवायचा म्हणून ही भारत जोडो यात्रा. आपण सगळ्यांनी राहुल गांधी, खरगे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

मराठा, ओबीसी, मुस्लिम आरक्षणाचे काय?

देशाला आज महागाई, बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहेत. पण इकडे हेवेदावेच सुरू आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळेचं आहेत. पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मग कशाला पाहिजे या कंपन्या. हा केंद्राचा विषय आहे, तो त्यांनी सोपा करावा. ईडब्लुएसच्या निर्णयाचे स्वागत करतो. मग मराठा समाजाला आरक्षण का वाढवून दिले नाही.

मुस्लिम समाजाचे, ओबीसीचे आरक्षणही अडकले. केंद्र निर्णय घ्यायला तयार नाही. राहूल गांधी तुमचे प्रश्न सोडवायला निघाले आहेत असेही चव्हाण म्हणाले. सभेच्या आधी काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी नगारा वाजवून सभेचे उद्धाटन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT