MLA Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातील काँग्रेस आमदारांचे काय ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : काँग्रेसचे नेते, दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतर आयुष्यभर ज्या भाजपच्या विरोधात लढले त्याच पक्षाचा भाग बनायला निघाले आहेत. गेल्या वर्षभरापासून चव्हाण भाजपवासी होणार अशा चर्चा होत होत्या, पण प्रत्येकवेळी चव्हाण यांनी हा भाजप व विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. (Congress Resignation, MLA Ashok Chavan)

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासारख्या नेत्यांनीच थेट चव्हाण यांच्या प्रवेशाचे दावे केले होते. अखेर ते खरे ठरताना दिसत आहेत. भारत जोडो यात्रेत चव्हाणांचा सहभाग, काल परवापर्यंत महाविकास आघाडीच्या राज्यातील आणि दिल्लीतील पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना उपस्थिती लावत त्यातून त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटालाही गाफील ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत चव्हाण यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर स्वतःच शिक्कामोर्तब केले आहे. मराठवाड्यात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यासह आठ आमदार आहेत. आता हे आमदार नेमकी काय भूमिका घेतात, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जालन्याचे कैलास गोरंट्याल, हदगाव- माधवराव पवार, पाथरी-सुरेश वरपूडकर, नांदेड दक्षिण-मोहन हंबर्डे, देगलूर-बिलोलीचे जितेश अंतापूरकर, लातूर शहर-धीरज देशमुख आणि लातूर ग्रामीणचे अमित देशमुख यांच्या भूमिकेकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील मोहन हंबर्डे, बिलोली- देगलूरचे जितेश अंतापूरकर आणि हदगावचे माधवराव पवार हे अशोक चव्हाण यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. शिवाय सध्या ते नाॅट रिचेबल असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या तिघांची नेमकी भूमिका काय असेल ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

लातूरच्या देशमुख बंधूंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही अधूनमधून झडत असतात. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एका जाहीर सभेत लातूरचे देशमुख बंधू कधीही भाजपच्या मांडीवर जाऊन बसू शकतात, असा दावा केला होता.

अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता भाजपच्या गळाला लागू शकतो, तर लातूरच्या देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही भविष्यात खरी ठरली तर त्याचे नवल वाटायला नको. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कोणावर जबाबदारी सोपवणार, या प्रश्नासह महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT