Latur DCC Bank News : कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाची निवडणुक आणि सत्ता, अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी, विरोधकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला बहुमत असताना महायुती सरकारने नवा कायदा आणत चार शासकीय सदस्य दुध संघावर नेमण्याचा निर्णय घेतला. या सदस्यांना मतदानाचाही अधिकार असणार आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपविरोधात रान पेटवले आहे.
गोकुळच्या सत्तेसाठी सरकारने थेट सहकार कायदाच बदलला याचा धसका सहकार क्षेत्रातील इतर संस्थानीही आता घेतला आहे. मराठवाड्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. महायुतीतील मतभेद आणि निलंगेकर कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या सहकार पॅनलने नुकताच आपला जाहीरनामा प्रकाशित केला. या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी विरोधकांवर टीका केली.
निलंगा तालुक्यात काँग्रेसचे नेते अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी आणि पुतणे अरविंद पाटील यांच्यात होणाऱ्या लढतीची विशेष चर्चा लातूर जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे. लातूर जिल्हा बँक चांगल्या लोकांच्या हातात असल्याचे सांगत अशोक पाटील निलंगेकर यांनी आपल्या पुतण्यांचे आरोप खोडून काढले. "तुम्ही माझ्यासाठी आमदारकी सोडली असती, तर मी तुमच्यासाठी बँक सोडली असती", असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांना बँकेत शिरकाव करण्याची संधीच देऊ नका, हे सांगताना अशोक पाटील निलंगेकर यांनी गोकुळ दुध संघातील सत्तेसाठी सुरू असलेला राजकीय संदर्भ सांगितला. सहकारमंत्री व्यासपीठावर आहेत, गोकुळ दुध संघात चार शासकीय सदस्य नेमण्याचा तुमच्या सरकारने घतलेला निर्णय कितपत योग्य आहे? कायद्याने असे करता येते का? असा सवाल निलंगेकरांनी केला. तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार योग्य नाही, असा आरोप करणाऱ्यांच्या सरकारनेच आम्हाला अकरा पुरस्कार दिले? ते आम्ही विकत घेतले का? असा टोलाही अशोक पाटील यांनी आपल्या पुतण्यांना लगावला.
गोकुळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला देत अशोक पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा बँकेच्या मतदारांना आवाहन केले. ‘गोकुळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर आधीच आपले चार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित पंधराही निवडून द्या. पूर्ण सत्ता हातात आली, तर कोणताही धोका उरणार नाही,’ असे ते म्हणाले.
विरोधकांकडून ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेने अनेक चांगले निर्णय घेतले असून, बँकेचा कारभार योग्य लोकांच्या हाती सोपवावा, अन्यथा भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.