Ashok Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

Nilanga Assembly Constituency 2024 : चाकूरकर, दिलीपराव देशमुख यांच्या भेटीनंतर निलंगेकर बंडाचे निशाण गुंडाळणार?

Ashok Patil Nilangekar of Congress will withdraw his candidature as an independent : निलंगेकर यांची बंडखोरी महाविकास आघाडी व काँग्रेसला महागात पडू शकते, याचा अंदाज जिल्ह्यातील नेत्यांना आला होता. त्यामुळे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सर्वच नेत्यांनी केले. दिलीपराव देशमुख आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा सल्ला निश्चितच निलंगेकर ऐकतील.

Jagdish Pansare

राम काळगे

Maharashtra Assembly Election 2024 : निलंगा मतदारसंघातून काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना डावलल्यानंतर त्यांचा समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहातून अशोक पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर माजी मंत्री व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी आपण स्वतः अशोक पाटील निलंगेकर यांच्याशी बोलणार आहोत, खासदार शिवाजी काळगे हे त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, त्यांची मनधरणी करणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले होते.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी अशोक पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची तर काल माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची भेट घेतली. (Congress) या भेटीत झालेल्या चर्चेनंतर उद्या (ता.4) अशोक पाटील निलंगेकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन बंडाचे निशाण गुंडाळणार? अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आल्या होत्या.

त्यामुळे निलंगेकर यांची बंडखोरी महाविकास आघाडी व काँग्रेसला महागात पडू शकते, याचा अंदाज जिल्ह्यातील नेत्यांना आला होता. त्यामुळे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सर्वच नेत्यांनी केले. दिलीपराव देशमुख आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा सल्ला निश्चितच निलंगेकर ऐकतील. आता त्यांना या दोन्ही नेत्यांनी काय सल्ला किंवा आश्वासन दिले हे लवकरच स्पष्ट होईल. अशोक पाटील निलंगेकर यांनी रविवारी शिवराज पाटील चाकूरकर व त्याच्याआधी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली होती.

निलंगा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच निलंगेकर घराण्याला वगळून काँग्रेस पक्षाकडून अभय साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयाची नाराजी म्हणून निष्ठावंत निलंगेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन काँग्रेसबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. (Latur) अखेर अशोक पाटील निलंगेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचे निशाण फडकवले. उमेदवारी मागे घेण्याचा उद्या, सोमवारी (ता.4) शेवटचा दिवस आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी निलंगेकर यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसते आहे. अशोक पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढवावी, अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत. तर काही कार्यकर्ते उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी करताना दिसत आहेत. शनिवारी काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी तब्बल दोन तास अशोक पाटील यांची निलंगा येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.

त्यामुळे निलंगेकर यांच्या निर्णयाकडे संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अशोक पाटील निलंगेकर व चाकूरकर यांच्या भेटीबाबत कार्यकर्त्यात वेगवेगळ्या चर्चाही होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT