Chhatrapati Sambhajinagar News : वीस वर्ष महापालिकेत एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर संभाजीनगर शहराला मिळालेल्या पाणी पुरवठा योजनेचे श्रेय लाटण्यासाठी मध्यंतरी शिवसेना-भाजप अन् उबाठा या तीन पक्षांमध्ये स्पर्धा लागली होती. जी योजना सहा वर्षातही पूर्ण झाली नाही, नळाला थेंबभर पाणी आले नाही तरी मंत्री अतुल सावे यांना जलसम्राट पदवी त्यांच्या समर्थकांनी बहाल केली. तर उद्धव ठाकरे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिल्याने या योजनेच्या कामाला वेग दिल्याचा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याकडून केला जातोय.
प्रत्यक्षात मात्र सहा वर्ष रखडलेल्या या पाणी योजनेतून अजून किमान एक वर्षतरी पाणी (Water Supply Issue) मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. वीस वर्षात पाणी प्रश्न न सोडवू शकलेल्या त्याच पक्षाच्या अन् त्याच नेत्यांना वारंवार निवडून देत संभाजीनगरकरांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असेच आता म्हणण्याची वेळ आली आहे.
महापालिकेची खडा न खडा माहिती अन् अभ्यास असल्याचा दावा करणारे शिवसेनेचे तीन टर्म आमदार राहिलेले प्रदीप जैस्वाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये आणि जवळीक साधून असलेले मंत्री अतुल सावे (Atul Save) अन् विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता असलेले आणि राज्यातील प्रश्नांनावरून सरकारशी आक्रमकपणे भांडणारे अंबादास दानवे हे नेते आपल्याच शहरातील पाणी प्रश्न मात्र सोडवू शकलेले नाहीत.
प्रदीप जैस्वाल नामानिराळे..
आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या राजकारणाची सुरुवात ही महापालिकेतून नगरसेवक म्हणून झाली. पुढे महापौर, खासदार आणि आता तीन टर्म आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. महापालिकेच्या राजकारणात अगदी सुरुवातीपासून रस असलेल्या जैस्वाल यांना महापालिकेचा दांडगा अनुभव आणि अभ्यास असल्याचे बोलले जाते. मग पाणी प्रश्नात हा अभ्यास कुठे कमी पडला? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. शहराच्या पाण्याच्या विषयावर जैस्वाल कधी बोलले? हे नागरिकांना आता आठवतही नाही.
जलसम्राट आता ठरले व्हिलन..
राज्याचे ओबीसी, बहुजन विकास मंत्री अतुल सावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनीच अतुल सावे यांना राज्यमंत्री पद देत संभाजीनगरसाठी 1680 कोटींची योजना मंजूर केली होती. त्यामुळे पुढे अतुल सावे यांना भाजपाच्या स्थानिक नेते पदाधिकार्यांनी जलसम्राट अशी उपाधी दिली. पण जे जल प्रत्यक्षात मिळालेच नाही, त्याचे सावे सम्राट कसे? हा खरा प्रश्न आहे. अतुल सावे यांनी 2018-19 मध्ये उद्योग राज्यमंत्री, 2022 ते 2024 पर्यंत सहकारमंत्री, तर सध्या बहुजन कल्याण मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
समांतर योजना बंद झाल्यानंतर विक्रमी वेळेत 1680 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून आणल्याचा दावा मंत्री अतुल सावे करतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निविदा प्रक्रियेला खीळ बसली, असा आरोप करून भाजप हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पण, योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून सावे योजनेपासून दूरच राहिले. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड वारंवार आढावा घेत असल्याने सावेंनी शहराच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले,असे बोलले जाते.
लबाड कोण? अंबादास दानवे उत्तर द्या!
महापालिकेच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेत मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक महापौर पदावर विराजमान राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजीनगरात पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपाच्या मांडीला मांडी लावून इतकी वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर पाण्यासाठी सुरु असलेले आंदोलन चेष्टेचा विषय ठरत आहे.
2002 पासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यभर दौरे करतात. जनतेचे प्रश्न मांडतात, पण ज्या शहरात ते स्वत: राहतात, त्या छत्रपती संभाजीनगरचा पाणीप्रश्न त्यांनी क्वचितच सभागृहात मांडला. शहराच्या पाणीप्रश्नावर एक-दोन लक्षवेधी वगळल्या, तर अंबादास दानवे यांनी फारसे प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला जातोय. आता 'लबाडांनो पाणी द्या'असे म्हणत ते आंदोलन करीत आहेत. पण खरे'लबाड'’ कोण? असा सवाल त्यांना नागरिकांकडूनच केला जात आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.