Bhumre-Sattar-shirsat-Save Political News, Aurangabad
Bhumre-Sattar-shirsat-Save Political News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : दोघांत तिसरा अन् शिरसाटांचे मंत्रीपद हुकले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : रखडलेल्या शिंदे - फडणवीस मंत्रीमंडळाच्या विस्तारात औरंगाबाद जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली. (Aurangabad) तर दुसरीकडे औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा राजयोग दुसऱ्यांदा हुकला. अखेरच्या क्षणी मंत्रीपदाने त्यांना पुन्हा हुलकावणी दिल्याने त्यांच्या समर्थकांना रूखरूख वाटली नाही तर नवल. भुमरे-सत्तार आणि भाजपकडून सावेंचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर चौथे मंत्रीपद एकाच जिल्ह्यात देणे शक्य नव्हते, म्हणून शिरसाटांना थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जाते.

ठाकरे सरकारविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सुरूवातीपासूनच सहभागी असलेले व शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे आमदार संजय शिरसाट बंडानंतर आक्रमकपणे उठावामागची भूमिका मांडत होते. (Marathwada) शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या खुल्या पत्रामुळे तर ते राज्यभरात चर्चेत आले.

सुरूवातीपासूनच शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल असे वाटत होते व त्यांनीही त्यादृष्टीने पुर्णपणे फिल्डींग लावली होती. त्यांचे मंत्रीपद जवळपास निश्‍चितच समजले जात होते. ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता.

मात्र मंत्रीमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधीच टीईटी घोटाळा आणि त्यात सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने मंत्रीपदासाठीच्या फोनमध्ये बदल झाला. सत्तार यांच्याऐवजी शिरसाटांना फोन गेला आणि खळबळ उडाली. मंत्रीमंडळ विस्ताराच्या तोंडावर आपला समावेश होऊ नये यासाठीच टायमिंग साधत आपल्यावर बदनामी करणारे आरोप करण्यात आल्याचे सांगत भूमिका मांडताना सत्तार यांनी चौकशी करा, कारवाई करा, दोषी नसेल तर आरोप करणाऱ्यांना फाशी द्या, असा पावित्रा घेतला.

शिरसाट की सत्तार असा पेच निर्माण झाला त्यावेळी अखेरच्या क्षणी शिरसाट यांचे नाव मागे पडल्याचे बोलले जात आहे. ठाकरे सरकारमध्ये संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री होते तर अब्दुल सत्तार राज्यमंत्री होते. यामुळे भुमरे यांचे कॅबिनेट कायम ठेवणे व सत्तार यांना प्रमोशन देणे गरजेचे होते, असा विचार करून त्यांना मंत्रीपद मिळाले.

मात्र आमदार संजय शिरसाट यांनाही ठाकरे सरकारमध्ये मंत्री होईल अशी अपेक्षा होती मात्र त्यावेळीही त्यांच संधी हुकल्याने किमान यावेळी तरी मंत्रीपद मिळेल याची साहजिकच अपेक्षा होती. भाजपच्या कोट्यातून अतुल सावे यांनाही प्रमोशन देत कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले. यामुळे एकाच जिल्ह्यात चौथा मंत्री करणे शक्य नव्हते आणि तिथेच शिरसाट यांचा पत्ता कट झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT