औरंगाबाद : जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या (Farmer) जन धन खात्यात 15 लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी ही रक्कम जमा झाली होती. मोदी सरकारनेच (Modi Government) 15 लाख रुपये खात्यात टाकले म्हणून या शेतकऱ्याने नवे घरही बांधले आहे. एवढेच नव्हे तर, त्याने याबद्दल आभार मानणारा ई-मेलही पंतप्रधान कार्यालयाला केला. परंतु, आता वेगळीच माहिती समोर आली असून, सगळेच त्यामुळे चक्रावले आहेत.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परदेशातील काळे धन परत आणण्याचे आश्वासन दिले होते. यातून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा जाहीर शब्दही त्यांनी दिला होता. या मोदींच्या आश्वासनाची वारंवार चर्चा होत असते. यातच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पिंपळवाडी गावातील ज्ञानेश्वर औटे यांच्या खात्यात 4 महिन्यांपूर्वी 15 लाख रुपये जमा झाले. यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
औटे यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा झाल्यानंतर सगळ्या गावात याची चर्चा झाली. अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर औटे यांनी 9 लाखां घर बांधले. मोदींनी 2014 च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत 15 लाख जनधन खात्यात टाकले असावे, असे औटे यांना वाटले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल करून आभारही मानले होते.
आता मात्र, वेगळीच माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीचा मिळालेला निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न होताऔटे यांच्या खात्यात जमा झाला होचा. पिंपळवाडी ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी आता त्यांच्याकडे तगादा लावला आहे. बँक ऑफ बडोदामधील खात्यातील एका क्रमांकाच्या चुकीने ग्रामपंचायतीचे 15 लाख 34 हजार 624 रुपये 17 ऑगस्ट 2021 रोजी औटे यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यांनतर त्यांनी बँक खात्यातून 9 लाख काढत घरही बांधले.
पंधराव्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेकडून मिळणारे हे पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याची चूक 4 महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. त्यानंतर बँक ऑफ बडोदाचे पत्र औटे यांना आले. घरासाठी खर्च केलेले 9 लाख रुपये तातडीने परत कुठून करणार, असा प्रश्न औटे यांना पडला आहे. ग्रामपंचायतीला आलेला निधी औटे यांच्या कडून कसा वसूल करायचा, असा प्रश्न बँक आणि ग्रामपंचायतीला पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.