Dr. Pratap Singh Patil Sarkarnama
मराठवाडा

Pratapsingh Patil: विजय दृष्टीपथात येताच प्रतापसिंह पाटील यांची भावनिक पोस्ट; म्हणाले, माझा संकल्प मराठवाड्यासाठी...

Aurangabad Graduate Constituency: विजय दृष्टीपथात आल्यानंतर त्यांनी भावनिक पोस्ट केली असून यामध्ये आपला संकल्प आणि मराठवाड्यातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांसाठी आपली काय योजना आहे? याची माहिती त्यांनी दिली आहे.

Amit Ujagare

Pratapsingh Patil: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे पण अद्याप घोषित झालेला नाही. हा विजय दृष्टीपथात आल्यानंतर त्यांनी भावनिक पोस्ट केली असून यामध्ये आपला संकल्प आणि मराठवाड्यातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांसाठी आपली काय योजना आहे? याची माहिती त्यांनी दिली आहे.

प्रतापसिंह पाटील ट्विटमध्ये म्हणतात, जनतेचा विश्वास, पदवीधरांचा कौल आणि नव्या जबाबदारीचा संकल्प करतो आहे. संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातून माझ्या विजयाचा हा क्षण केवळ आनंदाचा नाही, कृतज्ञतेचा आणि नव्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. मी, डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रत्येक पदवीधर मतदाराप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

हा विजय माझा एकट्याचा नाही. हा विजय त्या प्रत्येक पदवीधराचा आहे, ज्याने आपल्या भविष्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि शिक्षण, रोजगार व विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला. हा विजय त्या तरुणाईचा आहे, जिच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, त्या विद्यार्थ्यांचा आहे, ज्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत, तसेच त्या सर्व शिक्षकांचा, सुशिक्षित नागरिकांचा आणि परिवर्तनाची अपेक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

या निवडणुकीत अनेकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. अनेक सहकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक आणि माझ्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हाताचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि पदवीधरांच्या विश्वासातून हा ऐतिहासिक टप्पा गाठता आला.

प्रामाणिक संकल्प

आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आपल्या अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही आणि आपल्या प्रश्नांपासून दूर जाणार नाही, हा माझा प्रामाणिक संकल्प आहे.

पुन्हा एकदा, माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व पदवीधर मतदारांचे, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार..!

मराठवाड्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करूया. आपला विश्वास, माझी जबाबदारी, आपल्या अपेक्षा, माझा संकल्प आणि पदवीधरांचे हित, माझे सर्वोच्च प्राधान्य, असं प्रतापसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT