MNS-Bjp
MNS-Bjp Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : मनसेकडून भाजपला स्थापना दिनाच्या शुभेच्छा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गुडीपाडव्याच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत भाजपला (Bjp) पूरक अशी भूमिका घेतली. त्यांच्या या मेळाव्याची राज्यभरात चर्चा असतांनाच केंद्रातील भाजपचे बडे नेते मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आले. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका व राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज भाजपच्या स्थापनादिना निमित्त मनसेने (MNS) भाजपला शुभेच्छा देत तसे संकेत दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या पाच पैकी चार राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतरचा भाजपचा हा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मनसेने देखील या निमित्ताने भाजपला मनापासून शुभेच्छा देत त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादेत मनसचे शहर-जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले असून प्रत्यक्ष भेटून देखील ते शुभेच्छा देणार आहेत.

मुंबई महापालिके प्रमाणेच औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका देखील येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप या गेली अनेक वर्ष एकत्रित निवडणुका लढलेल्या आणि सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये आता फाटले आहे. त्यामुळे भाजपला नव्या मित्राचा शोध आहे. तर शहर व जिल्ह्यात फारशी ताकद नसलेल्या मनसेला देखील कुणाच्या तरी मदतीची गरज निवडणुकीत भासणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य पातळीवर भाजपशी जुळवून घेतल्याचे संकेत गुडी पाडवा मेळाव्यातून दिले होते. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरून अडचणीत सापडेल्या शिवसेनेचा हा मुद्दा हायजॅक करत राज ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे, शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीत इथे एमआयएमचा खासदार निवडून आला आहे.

महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेता येत नसल्याने मनसेने या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा हा त्याचच एक भाग म्हणावा लागेल. स्थानिक पातळीवर सध्या मनसे आणि भाजपचे सुर जुळले असून स्वंतत्रपणे पण सारख्याच मुद्यांवर हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या विरोधात मैदानत उतरल्याचे पहायला मिळाले.

त्यामुळे राज्य पातळीवर मनसे-भाजपची जवळीक वाढलेली असतांना इथे स्थानिक पातळीवर देखील मनसेकडून तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या स्थापनादिना निमित्त मनसे शहराध्यक्षांनी दिलेल्या शुभेच्छा याकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT