औरंगाबाद : आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत आमचीच सत्ता असेल, त्यामुळे आयुक्तांना काम करताना अडचण येणार नाही, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता. ३१) स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केला. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी स्वप्न पाहताय तर पहा, असा टोला लगावत या दाव्याची हवा काढून घेतली.
स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांच्यासमोर मेट्रो रेल्वे, शहरासाठी एकच उड्डाणपूल व शहराचा गतिशीलता आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. (Imtiaz Jalil) यावेळी शहरातील पार्किंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ताळमेळ नसल्याचा मुद्दा समोर आला.
त्यावर डॉ. कराड यांनी सध्याचे प्रशासक तरुण आहेत, याविषयावर ते चांगले काम करतील. महापालिकेत प्रशासक असेपर्यंत कोणाची अडचणही नाही. निवडणूका झाल्याच तर आमचीच सत्ता राहील, असे शेजारी बसलेल्या इम्तियाज जलील यांना चिमटा घेत कराड म्हणाले.
त्यावर इम्तियाज जलील यांनी क्षणाचीही विलंब न करता व मेट्रो रेल्वेचा आधार घेत स्वप्न पाहताय तर पहा... असा टोला लगावला व शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे पाहत, सत्ता आमची येईल, असा दावा केला. महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुका आगामी मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
त्यात शिवसेना, भाजप, शिंदे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या २५ वर्षापासून महापालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता होती. पण आता हे दोन्ही पक्ष विभक्त झाल्यामुळे एमआयएमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी तर येणारा महापौर आमचाच असेल असा दावा अनेकदा जाहीरपणे केला आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्न भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षाकडून पाहिली जात आहेत. आता नेमकं कुणाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं हे आगामी काळाताच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.