Ex. Mla Harshvardhan Jadhav Banner News, Aurangabad
Ex. Mla Harshvardhan Jadhav Banner News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : नामांतराच्या मुद्यावरून कोंडी, हर्षवर्धन जाधव आता कुणाचा गेम करणार ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : कुणी त्यांना सनकी म्हणतं, तर कुणी सटकलेला.. पण ते कायम चर्चेत असतात. मग कधी कौटुंबिक वादामुळे तर कधी राजकीय आरोप-प्रत्यारोंपामुळे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव सातत्याने चर्चेत असते. दोनवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या जाधव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Aurangabad) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका पार पाडली. तेव्हापासून ते काहींच्या नजरेत हिरो, तर काहींच्या व्हिलन ठरले.

पण कोणी काही म्हटलं तरी आपल्या पद्धतीने राजकारण, समाजकारण करत चर्चेत राहणे हीच जाधव यांची खासियत म्हणावी लागेल. (Marathwada) महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत अशा सर्वांवर जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून तोफ डागली. ती डागतांना अनेकदा पातळी सोडून (पण त्यांच्या दृष्टीने योग्य) टीका केली. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या वादात ओढल्यामुळे जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता.

आता याच प्रकरणात पोलिस जाधवांच्या मागावर आहेत. न्यायालयात सुनावणी होत नाही म्हणून सध्या हर्षवर्धन जाधव हे पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी भटकंती करत आहेत. हे त्यांनी स्वतःच पोस्ट व्हायरल करून सांगितले आहे. आता पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या समोरच लावलेले पोस्टर. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर केल्याचा दावा तेव्हाच्या महाविकास आघाडी आणि आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे.

यावर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संभाजीनगर नामांतर झाले का? अशी विचारणा केली होती. त्यावर या संदर्भात अद्याप आमच्याकडे कुठलेही आदेश आलेले नाहीत, असे लेखी उत्तर जाधव यांना देण्यात आले होते. यावरून दोन्ही सरकारकडून हिंदुत्ववादी मतदारांची कशी फसवणूक केली जात आहे, हे दर्शवणारा फलक जाधव यांनी लावला आहे. यातून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांना उघडे पाडण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला आहे.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा जनतेची कामे करा, असा उपदेशाचा डोस पाजणारे हर्षवर्धन जाधव राजकारणात आता आपल्याला काहीच नको, अशी भूमिका मांडतात. तर दुसरीकडे कमबॅकची तयारीही जोरात करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा गेम केल्यानंतर जाधव आता कुणाचा गेम करणार? याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT