Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सुषमा अंधारे यांनी शिरसाटांचे पुन्हा वाढवले टेन्शन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेत दाखल होऊन काही महिनेच झालेल्या सुषमा अंधारे यांनी पक्षात चांगलाच जम बसवला आहे. पदार्पणातच उपनेते पद आणि राज्यातील सत्तातंरामुळे जोरदार टीका करण्याची संधी हेरत अंधारे यांनी शिंदे गटाला सळोकीपळो करून सोडले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना आपल्या खास शैलीत उत्तर देत त्यांच्यावर तुटून पडल्यामुळे शिवसेना नेतृत्वाला देखील अंधारे यांची चांगलीच मदत होत आहे.

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे नुकतेच ह्दयविकारातून बरे होऊन आले आहेत. गेल्या महिन्यात त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात अॅन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. (Shivsena) काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शिरसाट आता कुठे सक्रीय व्हायला लागले होते, त्यात सुषमा अंधारे यांनी पुन्हा त्यांचे ब्लडप्रेशर वाढवणारे विधान केले.

शिंदे गटातील आमदार नाराज असून त्यांच्या परतीचे दोर आम्ही कापलेले नाहीत हे सांगतांना अंधारे यांनी थेट संजय शिरसाट यांचे नाव घेत तेच सध्या सर्वाधिक नाराज असल्याचा दावा केला. त्यामुळे मी नाराज नाही, योग्यवेळ आली की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या मंत्रीपदाबाबत निर्णय घेतील, असा खुलासा शिरसाट यांनी प्रसार माध्यमांकडे केला आहे.

आमच्या बहिणीला माझी काळजी आहे, हे ऐकून बरे वाटले असा टोला देखील त्यांनी लगावला. नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली, मात्र शिंदे गटाच्या बंडात अग्रेसर असलेल्या शिरसाटांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यामुळे ते नाराज आहेत अशा चर्चा आणि त्यामुळेच त्यांना ह्दयविकाराचा झटका देखील आला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली गेली.

मी नाराज नाही, माझ्या नाराजीच्या बातम्या न विचारता दिल्या तर मी माध्यमांना कोर्टात खेचेन, असा इशारा शिरसाट यांनी काही महिन्यांपुर्वी दिला होता. आता पुन्हा त्यांच्या नाराजीचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांचे नाव घेत केलेला दावा त्यांनी फेटाळला असला तरी विरोधकांच्या या नव्या खेळीने त्यांचा रक्तदाब निश्चितच वाढला असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT