औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जालना येथील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात आक्रमक भाषण केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम (Aimim) या दोन पक्षांनी भाजपकडून १ हजार कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप खैरेंनी या बैठकीत केला. एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशचच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने देखील समाजवादी पार्टी फोडण्यासाठी पैसे घेतल्याचे खैरे म्हणाले.
या आरोपानंतर वंचित आघाडी आणि एमआयएमकडून प्रतिक्रिया आल्या. (Shivsena) वंचितने खैरेंना थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिला, तर एमआयएमचे खासदार यांनी खैरेंच्या (Chandrakant Khaire) आरोपांकडे दुर्लक्ष करत आम्ही त्यांचे आरोप एन्जाॅय करतो असे म्हणत खिल्ली उडवली. वंचितने हे आरोप गांभीर्याने घेत रस्त्यावर आणि कोर्टात लढण्याची तयारी सुरू केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सुभेदारी विश्रामगृहावर बोलवली आहे.
त्यामुळे हे आरोप प्रकरण चंद्रकांत खैरेंच्या अंगलट येण्याची आणि त्यातून वंचित विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. एमआयएमने मात्र या आरोपांना फार महत्व द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे गेल्या काही दिवसांपासून अधिक आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहेत.
मग तो विषय औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरचा असो, जिल्ह्यातील विकासकामे, शहरातील पाणी प्रश्न, औरंगजेब कबर किंवा मग विरोधकांकडून महाविकास आघाडीवर होणारी टीका असो, शिवसेनेचे नेते म्हणून खैरे आक्रमकपणे आपली भूमिका मांडतांना दिसतात. नुकतीच महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याच्या दोन जांगासाठी शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार या दोन नावांची घोषणा केली.
खरंतर यावेळी खैरे यांचे नाव देखील चर्चेत होते, पण नंतर ते मागे पडले. परंतु खैरे यांनी यावर देखील मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत सामंजस्याची भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. भविष्यात कुठलेही राजकीय नुकसान होईल, असे विधान करायचे नाही, अशी पक्की खूनगाठ खैरेंनी मनाशी बांधलेली दिसते. परंतु संघटन बांधणीचे काम करतांना मात्र विरोधकांवर खैरे जोरदार हल्ला चढवतांना दिसत आहेत.
८ जून रोजी औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. ही सभा प्रचंड यशस्वी करण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते म्हणून खैरे यांच्यावर देखील आहे. यासाठीच ते जिल्ह्याजिल्ह्यांत दौरे व बैठका करत आहेत. अशाच एका जालन्याच्या बैठकीत खैरेंनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर निवडणुकीपुर्वी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये भाजपकडून घेतल्याचा आरोप केला.
असाच आरोप शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संषोष बांगर यांनी काही महिन्यांपुर्वी केला होता. त्यानंतर वंचितने बांगर यांना दम देत महाराष्ट्रात फिरू न देण्याची धमकी दिली होती. शिवाय आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा, अशी मागणी करत राज्यभरात आंदोलने सुरू केली होती. शेवटी बांगर यांनी माफी मागत यातून आपली सुटका करून घेतली होती.
आता पुन्हा खैरे यांनी वंचितवर तेच आरोप केल्यामुळे त्यांचे नेते आक्रमक झाले आहेत. शहरात निदर्शने किंवा थेट खैरेंच्या कार्यालय, घरासमोर आंदोलन करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दुपारी तीन वाजता होणाऱ्या वंचितच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भात भूमिका ठरवली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.