Shivsena District Deputy Chief Jaywant Oak News Aurangabd
Shivsena District Deputy Chief Jaywant Oak News Aurangabd Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : `हा आवाज कुणाचा, शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याचा`...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, शिवसैनिक आहे म्हणून मी शिवसेनाप्रमुख. शिवसैनिकांशिवाय मला शिवसेनाप्रमुख म्हणवून घेता येणार नाही. (Aurangabad) आज हे वाक्य आवर्जून आठवते, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सामान्य शिवसैनिकांपेक्षा नेते आणि चेले-चपाट्यांचीच गर्दी अधिक झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि आपल्यानंतर अनेक पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी असेल देखील.

आज जे उद्धव ठाकरे भेट देत नाही, त्यांच्या भोवतीचे बडवे आम्हाला भेटू देत नाही म्हणून बेंबीच्या देठापासून आरोळी ठोकत आहेत. (Marathwada) ते स्वतः आपापल्या मतदारसंघातील सामान्य शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना कितीवेळा भेटतात, त्यांच्या अडचणी सोडवतात किंवा मदत करतात याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेत (Shivsena) इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड पुकारले गेले आहे. ५५ पैकी ४० आमदारांनी पक्ष सोडणे ही साधी गोष्ट नाही.

राजकारणात महत्वाकांक्षा वाढली की त्याचा असा उद्रेक होतो. नेत्यांनी याकडे बारकाईने लक्ष देवून एकाचाच ताटात वाढण्यापेक्षा घास घास तळागाळापर्यंत शिवसेना पोहचवणाऱ्या सामन्य शिवसैनिकांच्या तोंडात टाकला तर आज जी परिस्थितीत उद्भवली ती टळली असती. राजकारणातील घराणेशाही हा गल्ली ते दिल्ली अशा स्तरावरचा प्रश्न बनला आहे. पाच-पाच वेळा निवडून आलेले, मंत्रीपद भोगलेले नेते देखील आता माझा मुलगाच, असा हट्ट धरतात तेव्हा खरंच त्यांची कीव करावीशी वाटते.

पायात जोडे नसलेले आज कोट्याधीश झाले, तरी त्यांची भूक संपत नाही. बरं ज्या शिवसैनिकांच्या जीवावर ते मोठे झाले, ते शेवटपर्यंत संतरंज्याच उचलत राहतात आणि त्याचे स्वतःला नेते म्हणवून घेणाऱ्यांनाही दुःख वाटत नाही. शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार हादरले आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदालाही त्याचे हादरे बसू लागले. त्यानंतर आता बंडखोरांच्या विरोधातील रोष आणि सामन्य शिवसैनिकांची ताकद तपासून पाहण्यासाठी मुंबईतील आणि स्थानिक नेते शहर आणि जिल्हाभरात मेळावे घेत आहेत.

कालपर्यंत ज्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेची फळ चाखली ते किती वाईट आहे, त्यांनी संपत्ती कशी कमावली याचे दाखले दिले जात आहे. सामन्य शिवसैनिक कशी आमची ताकद आहे, अशी टाळ्या मिळवणारी वाक्य देखील भाषणातून नेते फेकत आहे. पण आता या फेकाफेकीच्या विरोधात सामान्य शिवसैनिक आवाज उठवू लागला आहे. ज्यांना पाच नाही, दहा नाही पंधरा-वीस वर्ष डोक्यावर घेऊन तुम्ही सत्ता उपभोगायला दिली, त्यांनी गद्दारी केल्यानंतर पुन्हा नेत्यांना सामान्य शिवसैनिक आठवला.

पण हाच सामान्य शिवसैनिक जेव्हा नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेला नेत्यांकडे उमेदवारी माघतो तेव्हा मात्र तो रांगेत सगळ्यात शेवटी असतो. तिथे पुढे असतात ते फक्त पैशावाले, नेत्यांची मुल-मुली, सगे-सोयरेच. पक्षाचे स्थानिक आणि मुंबईत बसलेले नेते देखील डोळ्यावर पट्टी बांधून निर्णय घेतात आणि मग त्याचा असा स्फोट होतो. औरंगाबाद शिवसेनेतील एक उपजिल्हाप्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक यांनी काल झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेले भाषण या परिस्थितीत नेत्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे ठरले.

औरंगाबादेतील जुन्या व एकनिष्ठ शिवसैनिकांपैकी एक म्हणून बंडू ओक ओळखले जातात. जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा असो की मग लोकसभा. प्रत्येक निवडणुकीत आपल्या दुचाकीवर धनुष्यबाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि लाऊडस्पीकर लावून घसाफाटेपर्यंत ` ताई-माई अक्का, विचार करा पक्का, धनुष्यबाणावरच मारा शिक्का`, असा प्रचार ते करत आले आहेत. जाहीर सभांमध्ये बुलंद आवाजात घोषणा द्यायची म्हटलं की नेते बंडूला बोलवा असे फर्मान सोडायचे.

तर अशा या सामान्य शिवसैनिकांच्या सहनशिलतेचा बांध काल नेत्यासमोर फुटला. बंडखोरांचा समाचार घ्यायाला आलेल्या स्थानिक आणि मुंबईतील नेत्यांचा बंडू यांच्या भाषणानेच समाचार घेतला. आता तरी नेत्यांनी गटबाजी थांबवावी, माझ्यानंतर मुलगा, पत्नी, भाऊ, पुतण्या हे राजकारण थांबवून कधी तरी सामन्य शिवसैनिकाचा विचार करा, अशा शब्दात ओक यांनी व्यासपीठावर उपस्थितीत नेत्यांना सुनावले.

प्रत्येक शिवसैनिक, गावपातळीवरच्या गटप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या सगळ्यांच्या मनातील भावनांना ओक यांनी हात घातला होता. त्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित शिवसैनिकांनी त्यांना प्रतिसाद दिला. नेत्यांचे चेहरे पडले होते, पण गेंड्याच्या कातडीसारखे न वागता भविष्यात तरी सामन्य शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या कानी पडेल आणि ते नात्या-गोत्यापेक्षा आपल्यासाठी झिजणाऱ्या शिवसैनिकाचा विचार करतील अशी भाबडी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT