Mla Babajani Durrani
Mla Babajani Durrani Sarkarnama
मराठवाडा

बाबाजानींचा मुंबईत तीन दिवसांपासून मुक्काम, अजित पवारांची भेट काही होईना

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः परभणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (Mla Babajani Durrani) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते तीन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांची मनधरणी करणार असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांच्यासोबत दुर्राणी यांची भेट झाली असली तरी त्यात जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्या संदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही.

अजित पवार यांच्यासोबत काल एकत्रित बैठक होणार होती, मात्र ती देखील अजून झालेली नाही. दुसरकीडे बाबाजानी दुर्राणी यांच्या काॅंग्रेस प्रवेशाची सगळी तयारी झाल्याची देखील जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार दुर्राणी यांना टाळत तर नाही ना? अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि त्याला वरिष्ठांकडून पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा १६ नोव्हेंबर रोजी जंयत पाटील यांच्याकडे दिला होता. आठवडाभरानंतरही त्या राजीनाम्याबद्दल विचारणा किंवा निर्णय न झाल्याने अखेर दुर्राणी यांनी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा प्रसार माध्यमांकडे केली होती.

त्यानंतर लेगच काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुर्राणी यांच्याशी संपर्क साधून त्यांना पक्षात येण्याची आॅफर दिल्याचे बोलले जाते. मात्र दुर्राणी यांनी मात्र या चर्चेला दुजोरा न देता मी चाळीस वर्षांपासून शरद पवार साहेबांसोबत काम करतोय, पुढेही कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करत राहणार, अशी ग्वाही दिली होती.

दरम्यान, दुर्राणी यांचे हे राजीनामअस्त्र त्यांच्यावर उलटवण्याचे धोरण वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्याचे दिसते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अद्याप राजीनामा मंजुर केला नसला तरी, अजित पवारांकडून दुर्राणी यांना टाळले जात असल्याचे समजते. तीन दिवस होऊनही अजित पवार भेट देत नसल्याने बैठकीत काय झाले? अशी विचारणा करणाऱ्या प्रसार माध्यमांना देखील दुर्राणी वैतागून अजून तरी मी राष्ट्रवादीतच आहे, असे सांगत आहेत.

एकंदरित दुर्राणी यांची मनधरणी न करता त्यांची वाट मोकळी करून द्यायची, असेच धोरण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वीकारले की काय? अशी शंका येऊ लागली आहे. तर नेत्यांकडून न्याय मिळणार नाही? हे माहित असल्यामुळेच दुर्राणी यांनी देखील आपला प्लान बी तयार ठेवल्याचे समजते. दुर्राणी यांच्या काॅंग्रेस प्रेवशाचा मुहूर्त ठरला असून आधी त्यांचे चिरंजीव जुनेद खान व जिल्ह्यातील दुर्राणी समर्थक काॅंग्रेसवासी होणार आहे. त्यानंतर बाबाजानी देखील काॅंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT