बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर बीड जिल्हा कारागृहात हल्ला झाल्याची माहिती आहे. कारागृह प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पण भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते.
29 जून 2024 रोजी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात शशिकांत उर्फ बबन गित्तेसह मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे या 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून महादेव गित्ते हा बीड जिल्हा कारागृहात आहे तर बबन गित्ते फरार आहे.
खरंतर बबन गित्ते आणि बापू आंधळे हे दोघेही जुने सहकारी होते. बबन गित्तेच्याच पॅनलमधून मरळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून आंधळे सरपंच झाले. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर आंधळे यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत राहणे पसंत केले. तर वाल्मिक कराड सोबतच्या वादामुळे बबन गित्तेने 17 ऑगस्ट 2023 रोजी 700 गाड्यांचा ताफा घेऊन जात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
त्यानंतर 29 जून रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते यांना बँक कॉलनी परिसरात कट रचून बोलावून घेतले. त्यावेळी बबन गित्ते आणि आंधळे यांच्यात पैशावरून वादावादी झाली. हा वाद सुरू असतानाच बबन गित्तेन कमरेला असलेले पिस्तूल काढून बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप केला होता.
बापू आंधळे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर राजाभाऊ नेहरकरने आंधळेंच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यामध्ये आंधळे जागीच गतप्राण झाले. तर महादेव गित्ते याने आंधळेंसोबत आलेल्या ग्यानबा गित्ते यांच्यावरही गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले. मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी ग्यानबा गित्तेंना मारहाण केल्याचा आरोप झाला होता.
मात्र महादेव गित्ते याने या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेत आरोप केला होता. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचा दावा महादेव गित्तेने केला होता. बबन गित्ते तिथे उपस्थित नव्हता तर मग बापू आंधळे यांना गोळी लागेलच कशी? असा सवाल केला होता. तेव्हापासूनच महादेव गित्ते याच्या डोक्यात वाल्मिक कराडविषयीचा राग होता. आज याच रागातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.