Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी आपण मतदारसंघात जाऊन निवडून दिलेल्या जनतेशी चर्चा केल्यानंतर राजकीय निर्णय जाहीर करू, असे सांगीतले असले तरी त्यांचाही प्रवेश झाला असल्याचे सांगीतले जाते. एकीकडे ठाकरेंचे खासदार फुटले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले. जे खासदार फुटून गेले ते पैसे घेऊन फुटले असा आरोप त्यांच्यावर करणे चुकीचे आहे. तुमच्याकडे आहेत तोपर्यंत ते चांगले असतात, सोडून गेले की लगेच त्यांच्यावर पैसे घेऊन पक्ष सोडल्याचा आरोप करत त्यांना बदनाम करणे चुकीचे असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
शिवसेनेतील दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मातीतील संघटना अधिक मजबूत व्हाव्यात, यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ऑपरेशन टायगरमध्ये जे खासदार शिवसेनेत आले आहेत, तो निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला असावा.
संख्या हेच राजकारणातील महत्त्वाचे बळ असल्यामुळे त्यांनी या घडामोडी एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरच केल्या असाव्यात. राजकारण हे बेरजेचे असते. पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना दोष देण्याऐवजी नेतृत्वाच्या चुका काय आहेत, याचाही विचार झाला पाहिजे. आपणच आपल्या लोकांवर पैसे घेऊन फुटल्याचा आरोप करणे योग्य नाही. २०२९ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरेल. हे वर्ष शिवसेनेसाठीही महत्वाचे असेल, असेही बच्चू कडू यांनी सांगीतले.
न्यायालयाचा निकाल अंतिम..
पवन राजेनिंबाळकर हत्याकांड निकालावर बोलताना, न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. मात्र अनेकदा निकाल कुणाच्या बाजूने, तर कुणाच्या विरोधात जात असल्याने संभ्रम निर्माण होतो. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, परंतु खटल्यांच्या निकालासाठी २०-२० वर्षे लागतात, ही स्थिती बदलण्यासाठी न्यायालयीन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.