Sandipan Bhumre-Abdul Sattar
Sandipan Bhumre-Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

बागडेंचे अध्यक्षपद कायम, उपाध्यक्ष पदी मंत्री भुमरे समर्थकाची वर्णी; सत्तार तोंडघशी..

​प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकादा भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हे कायम राहीले आहेत. (Shivsena) तर उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थकाची वर्णी लागली आहेे. उपाध्यक्ष पदावरून भुमरे आणि सत्तार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला. यात भुमरे समर्थक निरफळ हे ९ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले. दरम्यान बरेच नाराजी नाट्य घडल्याने उपाध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.

आज अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत बागडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध अध्यक्ष झाले. बागडे (Haribhau Bagde) यांना बिनविरोध अध्यक्ष होण्यासाठी देखील पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बागडे यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

अर्थात यात देखील त्यांच्या स्वार्थ होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता जिल्हा दूध संघात किमान आपल्या समर्थकाला उपाध्यक्षपद मिळावे यासाठी सत्तार यांनी फिल्डींग लावली. पण जिल्हा बॅंकेप्रमाणेच दूध संघात सत्तारांची मनमानी चालू द्यायची नाही, यासाठी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काॅंग्रेसला माघार घ्यायला लावण्यात, भाजपचे बागडे, शिवसेनेचे सत्तार यांना यश आले. पण उपाध्यक्षपदी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी भुमरे यांनी देखील दूध संघात ठाण मांडले. विशेष म्हणजे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या मांडीलामांडी लावून ज्या बागडेंचा काटा सत्तार-भुमरे या जोडगळीने काढला होता. तेच आता जिल्हा दुध संघातील उपाध्यक्षपदावरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पहायाला मिळाले.

दोघेही माघार घ्यायला तयार नसल्याने उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. सत्तार यांनी उपाध्यक्षपदावरून माघार न घेण्याचा निर्णय घेत थेट भुमरे यांना हिमंत असेल तर मतदान घेऊन उमेदवार निवडून आणा, असे आव्हान दिल्याची चर्चा होती. तर अध्यक्षपद मिळाल्याने बागडे व भाजपचे संचालक या चढाओढीकडे गंमत म्हणून पाहतांना दिसले. अखेर बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरले आणि उपाध्यक्षपदासाठी मतदान झाले.यात भुमरे समर्थक निरफळ यांनी बाजी मारली. ९ मते घेत त्यांनी सत्तार समर्थक राजपूत यांचा पराभव केला.

नाही म्हणायला बागडे यांनी भुमरेंची समजुत काढण्यासाठी कसरत केली. पण ती व्यर्थ ठरली. बागडेंचे काम झाले म्हणून ते आता सत्तारच्या माणसासाठी आपल्याला गळ घालत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने भूमरे देखील आपल्या माणसाला उपाध्यक्ष करण्यासाठी अडून बसले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकाच पक्षाचे जिल्ह्यातील दोन मंत्री पण उपाध्यक्षपदासाठी एकमेकांचे तोंडही पहायला तयार नसल्याचे चित्र दूध संघात पहायला मिळाले.

यातून तोडगा न निघाल्याने अखेर मतदान प्रक्रिया पार पाडावी लागली. यात १४ संचालकांनी केलेल्या मतदानात भुमरे समर्थक दिलीप निरफळ यांना ९ तर सत्तार गोकुळ सिंग राजपूत यांना ५ मते मिळाली. समर्थक उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर सत्तार यांनी दूध संघाच्या कार्यालयातून काढता पाय घेतला. तत्पुर्वी उपाध्यक्षपदासाठी चुरस असतांना भुमरे व सत्तार हे एकमेंकासमोर न येता स्वंतत्र केबिनमध्ये बसून सुत्र हलवत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT