sambhaji patil nilngekar  Sarakarnama
मराठवाडा

Latur BJP News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाने, निलंगेकरांना गुदगुल्या..

Political News : अशोक चव्हाण आणि त्यांच्यापाठोपाठ बसवराज पाटील यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात बांधून घेत मोदी गॅरंटीवर विश्वास दाखवला.

Jagdish Pansare

Chhtrpati Sambhajinagar News : देशात आणि राज्याच्या राजकारणात धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपने महाराष्ट्रात काँग्रेसला नुकतेच दोन धक्के दिले. एक माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यमंत्री अशा मराठवाड्यातील दोन मातब्बर नेत्याना भाजपमध्ये प्रवेश देत काँग्रेसचे कंबरडे मोडले. अशोक चव्हाण आणि त्यांच्यापाठोपाठ बसवराज पाटील यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात बांधून घेत मोदी गॅरंटीवर विश्वास दाखवला.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची गाडी सुसाट सुटली आहे, तर बसवराज पाटील अजून कामाला लागायचेत. स्थानिक पातळीवर बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगेकर विरुद्ध पवार असा संघर्ष नवा नाही. काँग्रेसच्या अमित देशमुख आणि भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यातील पडद्यामागची युती प्रभावी ठरल्याने गेल्या काही वर्षात संभाजी पाटील निलंगेकर बॅकफुटवर गेले.

तसं पाहिलं तर पवार-निलंगेकर दोघेही एकाच गुरूचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे शिष्य तरी दोघांमधील मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले. वर्चस्वाच्या या संघर्षात अभिमन्यू पवार यांनी सध्या तरी निलंगेकर यांच्यावर मात केल्याचे चित्र आहे. निलंगेकरांचा विरोध असतांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी आपले खासगी सचिव असलेल्या अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज निलंगेकरांनी तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या बसवराज पाटील यांना छुपी मदत केल्याची चर्चा आजही होते.

परंतु, त्याचा बसवराज यांना काही फायदा झाला नाही, अभिमन्यू पवार यांनी निलंगेकरांनी आखलेले चक्रव्यूह भेदत अखेर विजय मिळवलाच. तेव्हापासून एकाच पक्षात असले तरी पवार-निलंगेकरांची तोंड कायम विरुद्ध दिशेलाच राहिली. पण राजकारणात केव्हा काय घडेल? याचा नेम नसतो, याची प्रचिती आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांचे विरोधक असलेल्या निलंगेकरांना आली असावी.

काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या राजकारणाला कंटाळून बसवराज पाटील यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पण तो घेतांना आणि नव्या पक्षाची निवड करतांना त्यांनी स्थानिक भाजपच्या एकाही नेत्याला विश्वासात न घेता थेट केंद्रीय नेतृत्वाकडेच फिल्डिंग लावली. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यामार्फत देशाचे गृहमंत्री आणि तिसऱ्या क्रमांकाचे मोठे नेते अमित शाह यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप प्रवेशासाठी 2024 मध्ये औसा विधानसभेची उमेदवारी आणि सत्ता आल्यानंतर मंत्रीपदाचा शब्द घेऊनच ते भाजपवासी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचे काय होणार? असाही प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाने संभाजी पाटील निलंगेकर मात्र भलतेच खूष झाल्याचे बोलले जाते.

बसवराज पाटील (Baswraj Patil) यांच्यासोबतीने देशमुख-पवार यांच्या पडद्यामागील राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न निलंगेकरांकडून केला जाऊ शकतो. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांना पुष्पगुच्छ देत निलंगेकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर आमदार अभिमन्यू पवार (Abhimnayu Pawar) यांनी बसवराज पाटील हे आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील, असे म्हटले आहे. आता जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात बसवराज पाटील नेमके कोणाचे मार्गदर्शक ठरतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT