Beed Crime 1 Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime : बीडमध्ये दोन वर्षांत 100 हून अधिक हत्या; IG सदानंद दाते आता मैदानात, घेणार गुन्हेगारीचा आढावा

IG Sadanand Date to review Beed worsening crime and law & order situation : 2024 ते 2026 या काळात राजकीय, खंडणी, वैयक्तिक आणि कौटुंबिक वादातून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांनंतर पोलिस दलाच्या कामकाजाचा आढावा; प्रलंबित तपास आणि कायदा-सुव्यवस्थेवर होणार चर्चा.

Pradeep Pendhare

Beed Crime Update : बीड जिल्हा गेल्या दोन वर्षांत (2024 ते 2026) राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकीय वैमनस्य, खंडणी, संघटित गुन्हेगारी, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक कलहातून झालेल्या हत्यांच्या मालिकेमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिस नोंदीनुसार, या कालावधीत जिल्ह्यात 100 हून अधिक खुनांची नोंद झाली असून, केवळ मागील तीन महिन्यांतच 27 पेक्षा अधिक हत्यांच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस महानिरीक्षक सदानंद दाते हे 7 ऑगस्ट रोजी बीड दौऱ्यावर येणार असून जिल्ह्यातील (BEED) गुन्हेगारीची स्थिती, तपासाची प्रगती आणि पोलिस दलाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केज तालुक्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला होता. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले असून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीवरही त्याचा परिणाम झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली.

खासदार पुत्र घुले हत्याप्रकरणात अडचणीत

केज तालुक्यातील टाकळी येथील 27 वर्षीय हॉटेल व्यावसायिक विलास नवनाथ घुले यांची 20 जून 2026 रोजी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांनी पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने या हत्येला मोठे राजकीय वळण मिळाले. या आरोपांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

घरगुती हिंसाचार वाढला

27 जुलै 2026 रोजी वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे 70 वर्षीय श्रीकिसन कोठुळे यांची त्यांच्या मुलाने विटेने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली. त्याआधी 2 फेब्रुवारी 2026 रोजी शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरात गुड्डू तांबोळी (वय 30) या युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

संतोष देशमुख प्रकरण राज्यात गाजले

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यभर चर्चेत आला. खून, खंडणी, दरोडे आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचे बोलले जात आहे.

IG सदानंद दाते बीड दौऱ्यावर

याच पार्श्वभूमीवर सदानंद दाते यांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील प्रलंबित गंभीर गुन्ह्यांचा आढावा, तपासाची गती, पोलिसांच्या कामकाजाचे मूल्यमापन तसेच कार्यक्षमतेबाबत आवश्यक सूचना दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कामकाजाबाबत गंभीर तक्रारी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयीही बैठकीत चर्चा होऊ शकते.

वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोरच आव्हान

दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे हे बीड पोलिस दलासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे 7 ऑगस्टच्या आढावा बैठकीत कोणते निर्देश दिले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT