Beed News, 04 Jan : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले मुख्य आरोपी आहे. शिवाय मागील अनेक दिवसांपासून सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे आरोपी फरार होते. त्यांना शोधून देणाऱ्यांना पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं होतं. तर काही नेत्यांनी या आरोपींची हत्या झाल्याची भीती देखील व्यक्त केली होती.
मात्र, अखेर या तिघांपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, सध्या वाल्मिक कराडनंतर (Walmik Karad) संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याचं नाव चर्चेत आहे. घुले गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला आणि केवळ सातवीपर्यंत शिकलेला घुले मोस्ट वाँटेड गुन्हेगार कसा झाला याबाबत स्थानिकांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
27 वर्षांचा सुदर्शन घुले हा केज (Kej) तालुक्यातील टाकळी गावचा असून त्याचं शिक्षण केवळ सातवीपर्यंत झालं आहे. शाळा सोडल्यानंतर घुलेला भाईगिरीचा नाद लागला. याच काळात तो विविध राजकीय नेत्यांसोबत फिरायचा नेते सांगतिल ते कामं करायचा आणि त्यातून पैसे कमवायचा. यामुळे तो नेत्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या सांगण्यावरून कोणालाही धमकावणं, मारहाण करणं असली कामे करू लागला.
तर त्याच्यावर अनेक चोरीचे आरोप असल्याचंही त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनेच त्याला लहानाचं मोठं केलं. वडिलांचा आधार नसल्यामुळे त्याचं पत्र्याचं साध घरं होतं. मात्र, त्याच्याकडे काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आहे. ती त्याच्याकडे कशी आली आणि कोणी दिली? याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
मात्र, तो केजमधील एका नेत्याच्या सांगण्यावरून तो कामं करायचा असंही त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं. दरम्यान, 6 डिसेंबरला मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पामध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांसोबत घुलेचा वाद झाला. यावेळी संतोष देशमुख यांच्यासह मस्साजोगमधील काही गावकरी मध्यस्थी करण्यासाठी आले तेव्हा त्यांचा सुदर्शन घुलेशी वाद झाला.
या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपला अपमान झाल्याचा राग घुलेच्या मनात होता. त्या रागातूनच त्याने संतोष देशमुखांची हत्या प्रकरणासाठी डावपेच आखत पुढचा सर्व प्रकार केला. अखेर त्याला पोलिसांनी (Police) अटक केल्यामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा लवकर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.