Parli Firing News : बँक कॉलनी परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं परळी शहर हादरलं. या घटनेत मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला आहे. तर, ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते गंभीर जखमी झाले आहेत.
सरपंच बापू आंधळे ( Bapu Andhale ) हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं. गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर गोट्या गित्ते याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रूग्णालयात युवकांनी मोठी गर्दी केली होती. आता गोळीबाराची घटना कशामुळे घडली? गोळीबाराआधी काय घडलं होतं? हे समोर आलं आहे.
याप्रकरणी गोट्या गित्तेनं दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शशिकांत बबन गित्ते ( रा. बँक कॉलनी, परळी ), मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते ( रा. वाघबेट ता. परळी ), महादेव उद्धव गित्ते ( रा. बँक कॉलनी, परळी ), राजाभाऊ संजीवन नेहरकर ( रा. पांगरी ता. परळी ), राजेश अशोक वाघमोडे ( रा. पिंपळगाव गाडे ता. परळी ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते ( Baban Gitte ) यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचं 'एफआयआर'मध्ये नमूद केलं आहे.
फिर्यादीत काय म्हटलं?
शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता आरोपींनी कट रचून सरपंच आंधळेंना महादेव गित्तेच्या बँक कॉलनीतील घरी बोलावून घेतलं. तेव्हा, बबन गित्तेंनी सरपंच आंधळेंना मा****ल्या तू पैसे आणले का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यावर आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका, अशी विनंती बबन गित्तेंना केली.
यादरम्यान बबन गित्ते आणि सरपंच आंधळेंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर गित्तेंनी कमरेची बंदूक काढत सरपंच आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली. तर, राजाभाऊ नेहरकरनं सरपंच आंधळेंच्या डोक्यात कोयत्यानं घाव घातले. यात आंधळेंचा मृत्यू झाला.
महादेव गित्तेनं फिर्यादी गोट्या गित्तेला जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नातून गोळीबार केला. ही गोळी गोट्या गित्तेच्या छातीत उजव्या बाजूला लागली. त्यासह मुकुंद गित्ते आणि राजाभाऊ वाघमोडेनं गोट्या गित्तेला बुक्क्यानं मारहाण केल्याचं 'एफआयआर'मध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.