Marathwada Politics News : विधान परिषदेच्या सतरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये परभणी-हिंगोली, नांदेड- बीड-लातूर-धाराशिव, छत्रपती संभाजीनगर-जालना या मराठवाड्यातील चार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. 2018 नंतर होऊ घातलेल्या या निवडणूकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. आकड्यांचा खेळ आणि घोडेबाजारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या निवडणूका रंजक होणार आहेत.
या निमित्ताने गेल्यावेळी धक्कादायक निकाल, वेगवान राजकीय घडामोडी, कुरघोडी आणि मतांमधील फूट यामुळे आजही चर्चेत असलेल्या बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आठवते. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेचा, सर्वात महागडा आणि कमालीच्या नाट्यमय घडामोडींसाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे.
मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत झालेला पडद्यामागच्या खेळ मोठा रंजक ठरला होता. पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी थेट लढत या मतदारसंघात पहायला मिळाली होती. दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ. 2018 मध्ये ही निवडणूक भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीत मतदार होते. कागदावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे पारडे प्रचंड जड होते. तिन्ही जिल्ह्यांचे मिळून एकूण 1 हजार सहा मतदार होते. विजयासाठी 504 मतांचा कोटा ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडे 527 मते होती. त्यांचा उमेदवार सहज निवडून येईल अशी परिस्थिती असताना ही बाजी पंकजा मुंडे यांनी आपल्या बाजूने फिरवली होती.
भारतीय जनता पार्टी कडे 321, शिवसेना 64 मते व अपक्ष व इतर मिळून 94 मते होती. भाजपाने रमेश कराड हे निवडणूक लढवण्यास इच्छूक असताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीतून आयात केलेल्या सुरेश धस यांना उमेदवारी दिली. यावर प्रचंड नाराज झालेल्या पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड यांनी तडकाफडकी भाजप सोडली आणि ते धनंजय मुंडे यांच्या गोटात सामील झाले. राष्ट्रवादीनेही त्यांना लगेच अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
कराडांची नाट्यमय माघार..
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, अचानक नाट्यमयरित्या रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कराडांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. ही माघार इतक्या ऐनवेळी घेतली गेली की, राष्ट्रवादीला सारवण्याची संधीच मिळू दिली गेली नाही. राष्ट्रवादीकडे स्वतःचा अधिकृत उमेदवारच उरला नाही आणि हा पक्ष अक्षरश: हतबल झाला. धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे भांडून रमेश कराड यांना उमेदवारी मिळवून दिली होती. पण त्यांनीच ऐनवेळी दगा दिला आणि धनंजय मुंडे तोंडघशी पडले.
मुंडे यांनी तातडीने हालचाल करत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या पाठीशी आपली सगळी ताकद झोकून दिली. रमेश कराड यांच्या माघारीमुळे सतर्क झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतदारांना सहलीवर पाठवत त्यांच्यावर पाळत ठेवली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मतदान पार पडले, पण निकाल कोर्ट कचेरीत अडकला. पण जेव्हा निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपाच्या सुरेश धस यांनी चमत्कार घडवला होता.
सुरशे धस यांनी 526 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडीच्या अशोक जगदाळे यांचा 452 मते घेऊनही पराभवच झाला. 74 मतांच्या फरकाने सुरेश धस यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. कागदावर केवळ 321मते असलेल्या भाजपने थेट 526 मते मिळवली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तब्बल शंभरहून अधिक मते फुटली होती.
रमेश कराड यांचे राष्ट्रवादीत जाणे आणि नंतर अर्ज मागे घेणे, हा पंकजा मुंडेंचाच 'मास्टरप्लॅन' होता, अशी राजकीय वर्तुळात तेव्हा चर्चा होती. पंकजा मुंडे यांच्या या खेळीने धनंजय मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा पराभव पहावा लागला होता. या निवडणुकीत एका-एका नगरसेवकाच्या मताला लाखो रुपयांचा भाव आल्याची आणि मते फुटू नयेत म्हणून कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.