Beed News : बीड जिल्ह्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालकांच्या दौऱ्यानंतरही सावरलेली नाही. विशेष म्हणजे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दोन महिन्यापूर्वी केलेल्या आपल्या बीड जिल्हा आढावा दौऱ्यात परळी पोलीस ठाण्याला भेट दिली होती.
हा दौरा होऊन काही महिने होत नाही तोच परळी पुन्हा हादरली. भाजपाचे नगरपरिषदेतील गटनेते तथा सभापती पवन मुंडे यांचा पुतण्या कृष्णा मुंडे यांच्यावर पंधरा-सोळा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यांवर चिंता व्यक्त केली जात असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजपच्या नेत्याच्या पुतण्याला एका टोळक्याने भररस्त्यात धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुन्या वादातून हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्री हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
परळीमध्ये हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून धारधार शस्त्रांनी भरचौकात हा हल्ला झाला असून पोलीसांनी या प्रकरणात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परळीतील शिवाजी महाराज चौकात जुन्या वादाचे कारण पुढे करत पंधरा ते सोळा जणांच्या टोळक्याने कृष्णा मुंडे यांना गाठले. सोडू नका, याला मारा असे म्हणत हल्लोखोरांनी मुंडे यांना घेरले. त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत दगड, लाथाबुक्क्या आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात कृष्णा मुंडे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील व्हायरल झाला असून परळीतील वातावरण तापले आहे.
याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी हनुमंत फड, सतीश हनुमंत फड, संदीप सोनवणे, विशाल सारणीकर, महेश कांता शिंदे, बालाजी दहिफळे आणि भागवत साबळे या आरोपींचा यात समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपांचा शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.