Dhananjay Munde, Bajrang Sonwane And Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha: बहिणीला पाडण्याची पालकमंत्र्यांना घाई; सोनवणेंचा मुंडेंवर हल्लाबोल

Bajrang Sonwane On Dhananjay Munde: "सरपंचांना विचारले तर लोक ऐकत नाहीत, असं सांगतात, उद्या कामे घेऊन आलात तर सरकार आमचे ऐकत नाही असं आम्ही म्हणालो तर" मुंडेच्या या वक्तव्याचा सोनवणे यांनी चांगलाच समाचार घेतला.

Dattatrya Deshmukh

Beed Lok Sabha Election 2024: पंधरा दिवसापासून आपण पालकमंत्र्यांना जरा सबुरीने घेण्याचा सल्ला देतोय, पण ते काही ऐकत नाहीत. रोज बहिणीच्या अडचणी वाढवणारी वक्तव्य करत आहेत. एकूणच त्यांची सगळी धावपळ बहिणीचा पराभव करण्यासाठीच आहे की काय, असं म्हणत बीड मतदारसंघाचे (Beed Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी धनंजय मुंडेना टोला लगावला आहे. सरपंचांना दारात येऊ नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेची मते मागण्याचा अधिकार नाही. त्यांचा अस्वस्थपणा कशाचे द्योतक आहे? असा प्रश्नही सोनवणे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आज मंगळवारी आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी आष्टी तालुक्यातील एका सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "सरपंचांना विचारले तर लोक ऐकत नाहीत, असं सांगतात, उद्या कामे घेऊन आलात तर सरकार आमचे ऐकत नाही, असं आम्ही म्हणालो तर" मुंडेच्या (Dhananjay Munde) या वक्तव्याचा सोनवणे यांनी चांगलाच समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते सोनवणे म्हणाले, सरपंचांबद्दल हे पालकमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य आहे. निवडणुकीत टोकाची व व्यक्तिगत टीका होणार नाही याची दक्षता घ्या, थोडं सबुरीने घ्या, असा मैत्रीचा सल्ला आपण पालकमंत्र्यांना दिला होता. पण ते काही केल्या थांबत नाहीत. रोज नवनवीन आरोप करत आहेत. त्यात ते स्वतःचा नाकर्तेपणादेखील अधोरेखित करत असल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला. सरपंचाच्या बाबतीत वक्तव्य करून बहिणीच्या (पंकजा मुंडेंच्या) अडचणी वाढवण्याचेच काम पालकमंत्री करत असल्याचा टोला सोनवणे यांनी या वेळी लगावला.

शिवाय आपल्या बहिणीला पाडण्याची त्यांना घाई झाली आहे कि काय, असे वाटू लागले आहे. त्यांचा पराभव जनता करणारच आहे. त्यासाठी चार जूनची वाट तरी बघा असेही बजरंग सोनवणे म्हणाले. तसेच माझ्या जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवता, आतापर्यंत आम्हाला या कुणबी जातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले आणि आता आम्ही प्रमाणपत्र काढले तर पालकमंत्री आणि उमेदवाराच्या पोटात का दुखते. मला मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्यामुळेच जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याचेही बजरंग सोनवणे म्हणाले.

सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने शेतीसाठी आवश्यक वस्तूंच्या किमती चौपट करून त्यांच्या आयुष्याशी खेळ चालवला असल्याचंही सोनवणे म्हणाले. तसेच आपण निवडून गेल्यानंतर दोनच वर्षांत रेल्वे परळीपर्यंत नेऊन दाखवू व जिल्हावासियांची स्वप्नपूर्ती करू. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रकल्प उभारू व त्यांच्या हाताला काम देऊ, असं आश्वासनही बजरंग सोनवणे यांनी मतदारांना दिलं.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT