Beed News : महानगरपालिका व्हावी येवढी लोकसंख्या पण पुढाऱ्यांच्या राजकीय साेयीसाठी बीडला नगरपालिकाच. तरीही मराठवाड्यातील सर्वात मोठी नगरपालिका आणि वेगाने वाढणारे शहर अशी बीडची ओळख. शहराच्या विकासाची व नागरिकांना नियमित सुविधा पुरवण्याची भिस्त नगरपालिकेवर. प्रचलित पुण्याची वाट वाकडी करुन अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडची तर आमदार विजयसिंह पंडितांनीही गेवराईच्या वाटेवरील बीडची धुरा खांद्यावर घेतली. मात्र, मोठ्या अपेक्षेने बीडकरांनी केलेले सत्तांतर आणि यामुळे बदललेले राजकीय समिकरण कठीण आहे. त्यामुळे वाट वाकडी करणाऱ्यांना यंत्रणा सरळ चालविण्याचे दिव्य पेलायचे आहे.
पंधरवाड्याला पाणी, बंद पथदिवे, रस्त्यांवर धुळ, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, जनावरांचे कळप, कुत्रयांचे घोळके, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवर अनाधिकृत गतीरोधकांच्या समस्यांनी बीडकर त्रस्त आहेतच. शिवाय बांधकाम करताना एफसआय न सोडणे, अनाधिकृत गतिरोधक, अतिक्रमण, अनाधिकृत बॅनरसारख्या समस्या जिवघेण्या ठरु पाहताहेत. शहरातील हजारो ओपन स्पेस गायब आहेत.
याचे कारण म्हणजे, सत्ताधाऱ्यांजवळ जमलेल्या ठेकेदार व भूमाफिया आणि बिल्डरांच्या लॉबीचे लाड. आता पुन्हा याचीच पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती आहे. नगराध्यक्षांच्या उमेदवारीसाठी लॉबींग करणारे बिल्डर आणि प्लाटींग मधीलच आणि निम्म्यावर सत्ताधारी नगरसेवकही त्यातलेच. काहींवर भूमाफियागीरीचे गुन्हेही दाखल आहेत.
त्यात भर म्हणजे स्विकृत नगरसेवकांच्या निवडीत सामाजिक समिकरणाच्या नावाखाली मुंदडांची वर्णी म्हणजे पुर्वीच्या क्षीरसागर - सारडा या समिकरणाची आता पंडित - मुंदडा ही नवी आवृत्ती तर नाही ना, हे जाणकार बीडकरांना म्हणायला वाव आहे. बिल्डरांची लॉबी, ठेकेदारांची जवळीकीमुळे शहरात पुन्हा भूमाफीयागीरीची भितीही बीडकरांना वाटतेय.
पालिकेच्या प्रशासनात खाबूगिरी वाढलीय, बहुतांश कर्मचारी नगरसेवक, ठेकेदार व व्यापाऱ्यांचे बाहुले आहेत. कराची रक्कम गायब करण्याचे धारिष्ट्य असलेल्या या मंडळींना वठणीवर आणणे, सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे धाडस करावे लागणार आहे. पालकमंत्री अजित पवारांनी शहरात सीट्रीपलआयटी, विज्ञान पार्क, तारांगण असे प्रकल्प हाती घेतल्याने बीडकरांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला आणि मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली.
पहिल्या टप्प्यात शहराची अमृत अटल योजना कार्यान्वित होणे अपेक्षीत आहे. ठेकेदाराने योजनेची वाट लावली असून पुरेसा वीजदाब नसल्याने पुरवठा विस्कळीत आहे. 25 वर्षांपासून कर वाढवला नाही, असे ऐकून बीडकरांचे कान किटले आहेत. सामान्यांचे शंभर रुपये माफ करुन धनदांडग्यांना लाखो रुपयांच्या कर सवलतीचे प्रकार, बांधकाम करताना पार्किंगची सक्ती, गिळलेले भुखंडांच्या ठिकाणी सार्वजनिक मंदीरे, उद्यानांची गरज आहे. शहरातील रस्त्यांसाठीचा 125 कोटी रुपयांचा प्रस्तावावरील धुळ निघावी अशी बीडकरांची अपेक्षा आहे.
या निवडणुकीने समिकरणे बदलली आणि बीडकरांच्या अपेक्षा वाढविल्या. खुद्द पक्षाध्यक्षांचे जिल्ह्यावर लक्ष असले तरी बदलत्या राजकीय समिकरणामुळे बदललेल्या गणिताची जुळलेली बेरीज टिकविण्याचे आव्हान विजयसिंह पंडित यांच्यासमोर आहे. पहिल्या टप्यात भ्रमनिरास आणि विश्वासघाताचा शिवसंग्रामचा आरोप आहे.
उद्या नगर पालिकेतील प्रशासन ताळ्यावर आणणे, अव्वल माहिर सहकाऱ्यांसोबत सत्ता चालविण्याचे आणि मित्रपक्षांना सांभाळण्याचे आणि विरोधकांना तोंड देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यात आमदार संदीप क्षीरसागरांनीही (Sandip Kshirsagar) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वाट वाकडी केल्याने भविष्यात पवारांकडून त्यांच्या झोळीत सुत्र गेले तर वाट वाकडी करणाऱ्या विजयसिंह पंडितांनाही नगर पालिकेत केलेल्या उठाठेवीचा काहीच फायदा नसेल आणि क्षीरसागरांना थेट अंगावर घेणाऱ्या सत्ताधारी नगरसेवकांची गत तर ‘फुफाट्यातून आगीत’ अशीच हेाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.