Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Protestors Damages 57 Buses : बीडमध्ये बस स्थानकात शिरून ५७ बस फोडल्या; ७० लाखांचे नुकसान

Maratha Reservation : बीडमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बस बंद ठेवण्यात आल्या होत्या

Datta Deshmukh

Beed Political News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी (ता. ३१) हाताबाहेर गेले. नेत्यांचे घर, बंगले व पक्षांचे कार्यालये तसेच हॉटेलच्या तोडफोडीनंतर तब्बल ५७ बस फोडण्यात आल्या. वास्तविक बससेवा बंद ठेवलेली असताना स्थानकात लावलेल्या या बसच्या सर्व काचा फोडल्या आहेत. यात महामंडळाचे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सोमवारी आंदोलकांनी अगोदर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकले. त्यानंतर सुभाष रोडवर दगडफेक करून व्यापारपेठ बंद केली व शुभम ज्वेलर्स फोडले. यानंतर माजी बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनला आग लावण्यात आली. यानंतर मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे शहरातील कार्यालय तसेच त्यांचे व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नगर रोडवरील बंगल्यासमोरील गाड्या जाळण्यात आल्या. याच काळात भाजप, शिवसेना कार्यालयांचीही तोडफोड करण्यात आली. तसेच शिवसेनेचेही कार्यालय जाळण्यात आले. काही काळाने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

मात्र, याच काळात बस स्थानकात उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल ५७ बस फोडण्यात आल्या. शनिवारी रात्री बस जाळल्यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील आठही आगारांच्या ४५० बस एकाच जागी उभ्या आहेत. बीड आगाराच्या बस येथील बस स्थानकात उभ्या होत्या. समोर बॅरिकेट्स लाऊन खासगी सुरक्षारक्षक व पोलिस दिवसभर थांबून होते. तरीही आंदोलकांनी रात्रीच्या वेळी आतमध्ये जाऊन सर्वच बसच्या मागच्या पुढच्या आणि बाजूंच्या काचा फोडल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलांना दिवसेंदिवस उग्ररूप येत आहे. राज्य भरात या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या साखळी उपोषणानंतर बीडमध्ये काही ठिकाणी बसची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. नेत्यांचे बंगलेही यातून वाचले नाहीत. संतापलेल्या आंदोलकांनी नेत्यांची घरे, कार्यालये, हॉटेल्स, दुकानांचीही जाळपोळ आणि तोडफोड केली. बीडमध्ये साधारण २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बीडमध्ये सुभाष रोडवरील मंगेश लोळगे यांच्या दुकानाची आणि दुचाकीची तोडफोड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नगर नाका येथील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यामुळे यात संगणक, फर्निचरसह जवळपास दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT