Congress Leader Rajani Patil, Deshmukh And Sonawane Sarkarnama
मराठवाडा

Beed : पदांची बरसात केज भागातच; जिल्ह्यात काँग्रेस कधी वाढणार ?

निमंत्रीत सदस्यांच्या नेमणूकांचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी काढले. यातही मिळालेली दोन्ही पदे केज म्हणजेच खुद्द जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे यांना मिळाली. (Congress)

Dattatrya Deshmukh

बीड : जिल्ह्यात काँग्रेस कुठेय असे उपरोधाने विरोधक म्हणत असले तरी सध्या पक्षातील आणि विशेषत: केज भागातील काँग्रेस (Congress) नेत्यांवर पदांची बरसात सुरु आहे. त्यामुळे अच्छे दिन पक्षाला नसले तरी पदांच्या माध्यमातून नेत्यांना ते येत आहेत. (Beed) केज भागात पदे देऊनही या भागातीलच पक्षाची ताकद पुर्वीपेक्षा कमी झालेली आहे. आता भविष्यात जिल्ह्यात पक्षाची ताकद कधी व कशी वाढणार हा खरा प्रश्न आहे.

पुर्वीही रजनी पाटील राज्यसभेवर खासदार होत्या. त्यांच्या ताब्यात केज नगर पंचायतीची सत्ता होती. तर, जिल्हाध्यक्षपदही याच मतदार संघातील अंबाजोगाईचे राजकिशोर मोदी यांच्याकडे होते. त्यांच्याही ताब्यात अंबाजोगाई नगर पालिकेची सत्ता होती. एकूणच एकमेकांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले रजनी पाटील (Rajani Patil) व राजकिशोर मोदी यांनी कधीही केज मतदार संघाबाहेर पक्षविस्ताराचे नेटाचे प्रयत्न केले नाहीत.

परिणामी केज मतदार संघाच्या बाहेर पक्षाला इतर मोठा विजय दुरच पण स्थानिक स्वराज्य संस्थांतही साधी एखाद - दुसरी जागाही जिंकता आली नाही. त्या काळातही राजकीय डावपेच इतर पक्षांवर नाही तर पक्षांतर्गतच चालत. मागच्या काही महिन्यांत पक्षांतर्गत राजकीय समिकरणे बदलली. दिल्लीत काँग्रेसमध्ये वजन असलेल्या रजनी पाटलांमुळे अचानक दिल्लीतूनच सुत्रे हालली आणि राजकिशोर मोदी यांच्या गळ्यातील जिल्हाध्यक्षपदाची माळ पाटील समर्थक राजेसाहेब देशमुख यांच्या गळ्यात पडली.

राजेसाहेब देशमुख देखील केज मतदार संघातीलच हे विशेष. त्यानंतर काहीच दिवसांनी खुद्द रजनी पाटील यांनाही पक्षाने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत संधी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात त्यांच्या होमपिच केज नगर पंचायतीत तीन जागा आणि पाटोदात एक अशा चार नगरसेवक विजयी करतानाच पक्षाची पुरती दमछाक झाली. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी कार्यकारीणीत बऱ्यापैकी बदल केले. आढावा बैठका, पक्षाच्या धोरणांच्या बैठकांचे त्यांचे सत्र सुरु आहे.

दरम्यान, परवा जिल्हा नियोजन समिती निमंत्रीत सदस्यांच्या नेमणूकांचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी काढले. यातही मिळालेली दोन्ही पदे केज मतदार संघात म्हणजेच खुद्द जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे यांना मिळाली. दोघेही केज मतदार संघातले आणि कट्टर पाटील समर्थकच. यापूर्वी काँग्रेसच्याच कोट्यातून दिलेली व या दोघांच्या निवडींमुळे रद्द झालेले सदस्यपदे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.

तत्कालिन जिल्हाध्यक्ष मोदी यांच्या शिफारशीवरुन सुनिल टाकळकर व महादेव धांडे या पदावर होते. आता मात्र पदे स्वत:कडे घेतली आहेत. त्यात दोघांच्याही निष्ठेबद्दल अजिबात शंका नसली तरी जिल्ह्यातील इतर भागांत किंवा पक्षाच्या इतर निष्ठावंतांना पदे देता आली असती. नुकतीच तिसरी निवड जिल्हा महिला व बालकल्याण समितीची झाली. यात अध्यक्षांसह इतर चार सदस्यांत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एकमेव केज नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा शितल दांगट आहेत.

त्याही पाटील समर्थक आणि पुन्हा केज भागातीलच. एकूणच पदांची ही रेलचेल आणि बरसात केज मतदार संघातच होत आहे. म्हणजेच पक्षाला जिल्ह्यात पाय रोवायचेत कि फक्त केज भागात हे कळण्यापलिकडे आहे. त्यातही महाविकास आघाडीच्या किंवा पुर्वीच्या आघाडीच्या सुत्रानुसार हा मतदार संघच राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे.

आता नगर पालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यात या पदांच्या माध्यमातून पक्षाचा ‘हात’किती बळकट होतो हे पहावे लागेल. नाही तर पक्षाच्या माध्यमातून फक्त काँग्रेसजनांनाच अच्छे दिन आणि पक्षाची मात्र वाताहत हा २२ वर्षांपासूनचा प्रवास असाच सुरु राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT