Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : इतिहासाची पुनरावृत्ती : इंदिरा अन् बाळासाहेबांचा नातू एकत्र!

सरकारनामा ब्यूरो

नांदेड : "संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी आपण लढत आहोत, देशात घटनाबाह्य काम सुरु आहे म्हणूनच, आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे." असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. यात्रेत सहभागी होण्यापुर्वी शुक्रवारी (ता. ११) त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, "संविधान आणि लोकशाही यासाठी आपण लढत आहोत, मात्र चार महिन्यांपूर्वी राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. अशाच वागणुकीमुळे आपल्याला आणि देशाला धोका आहे. संजय राऊत यांच्याबाबतचा न्यायालयाचा आदेश पाहिला तर, त्यात कशा पद्धतीने अडकवण्यात आले आहे, हे लक्षात येईल. म्हणूनच आम्हीपण भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे."

कॉंग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान, भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी सहभाग नोंदविला. यावेळी हिवरा फाटा ते जामगव्हाण असे आठ किलोमीटरचे अंतर त्यांनी सोबत पूर्ण केले. वानखेडे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी गळ्यात भगवं उपरणं टाकून पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

आमदार बांगरांच्या मतदारसंघात ठाकरेंची हवा :

भारत जोडो पदयात्रा राहुल गांधींची पण हवा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची पहायला मिळाली. मविआ मधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त नेतेच काल नांदेडमध्ये पदयात्रेत सहभागी झाले होते. पण आदित्य यांनी शक्तीप्रदर्शनासाठी कळमनुरी मतदारसंघाची निवड केली, अशी चर्चा होती. कॉंग्रेसच्या बरोबरीने शिवसैनिकांनी यात्रेत सहभाग नोंदविल्याने 'पन्नास खोके एकदम ओक्के' 'बांगरांचे करायचे काय..' अशा घोषणा देत यात्राच दणाणून सोडली.

इंदिरा अन् बाळासाहेबांचा नातू एकत्र :

भारत जोडो यात्रेत आज एक वेगळाच प्रसंग पहायला मिळाला. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या आक्रमक स्वभावाने विख्यात होते. तसेच त्या दोघांची लोकप्रियताही प्रचंड होती. आज त्या दोघांचे नातू खांद्याला खांदा लावून पदयात्रेत चालत होते. हा प्रसंग आपल्या डोळ्यात साठवावा, मोबाईल कॅमेरात टिपावा, यासाठी दुतर्फा लोकांचा उत्साह जाणवत होता.

बाळासाहेब ठाकरेंनी आणिबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाचे समर्थन केले होते. आणिबाणीला ठाकरेंनी पाठींबा दिला होता. त्या काळात इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात राजकीय सौहार्द निर्माण झाले होते. आज त्यांचे नातू भारत जो़डो यात्राच्या निमित्ताने एकत्र चालताना दिसले, या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्तीची झाल्याचे भावना जनमानसातून व्यक्त होत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT