Pradeep Naik, Bhimrao Keram Sarkarnama
मराठवाडा

Bhimrao Keram Vs Pradeep Naik : माहूर बाजार समितीत 'हायव्हाेल्टेज ड्रामा'; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Mahur APMC election : मतदारांचा कौल कुणाला, हे रविवारी होणार स्पष्ट

Sunil Balasaheb Dhumal

साजीद खान

Nanded Political News : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थानिक निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत असो वा बाजार समिती, या निवडणुका आमदार-खासदारांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. यातूनच माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची 'टशन' पाहायला मिळाली. या दोन्ही नेत्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी माहूर बाजार समितीत 'हायव्हाेल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला. या बाजार समितीचे शनिवारी मतदान झाले असले तरी मतदार कुणाला कौल देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Latest Political News)

या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार)चे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेना (ठाकरे गट) चे ज्योतिबा खराटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा शेतकरी विकास पॅनेल व भाजपचे आमदार भीमराव केराम, काँग्रेसचे नामदेवराव केशवे आणि शिवसेनेचे सचिन नाईक यांच्या शेतकरी शेतमजूर बळीराजा विकास पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. या बाजार समितीच्या १६ संचालक पदासाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत सुमारे ९५.४९ टक्के मतदान झाले आहे.

बाजार समिती निवडणुकीनिमित्त आजी-माजी आमदारांसह दोन्हीही पॅनेलच्या प्रमुख धुरिणांनी माहूर, किनवट तालुक्यातील गावे पिंजून काढली. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांत प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे त्यांनी मतदानादिवशी सकाळपासूनच आपल्या समर्थकांसह मतदान केंद्राबाहेर तळ ठोकला होता. (Maharashtra Political News)

बळीराजा शेतकरी विकास पॅनेलने व्यापारी मतदारसंघातील दोन जागा आधीच बिनविरोध करत खाते खोलले आहे. या निवडणुकीनिमित्त दोन्हीही पॅनेलमध्ये जोरदार चुरस पाहावयास मिळाली. आजी-माजी आमदारांनी विजयाचा दावा केला आहे. परिणामी बाजार समितीची ही निवडणूक विधानसभा, लोकसभेची रंगीत तालीम असल्याचेच चित्र पाहायला मिळाले.

एकंदरीत माहूर बाजार समितीसाठी पार पडलेल्या मतदानानंतर भाजप आमदार भीमराव केराम, काँग्रेसचे नामदेवराव केशवे, शिवसेनेचे सचिन नाईक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, ठाकरे गटाचे ज्योतिबा खराटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने हे रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघनिहाय झालेले मतदान

  • व्यापारी मतदारसंघ : बिनविरोध

  • ग्रामपंचायत मतदारसंघ : एकूण मतदान ५६७ पैकी ५३८ मतदान

  • सोसायटी मतदारसंघ : एकूण मतदान ५४७, त्यापैकी ५२४ मतदारांनी हक्क बजावला

  • हमाल व मापाडी मतदारसंघ : एकूण ४० पैकी ४० मतदान झाले.

  • एकूण मतदान ११५४ पैकी ११०२ झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT