Marathwada Political News : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील मंडळाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्यानंतर आज जिल्हाध्यक्ष आणि महानगरप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळ अध्यक्ष नियुक्तीच्या वेळी बीड, लातूर जिल्ह्यात स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्याने तेथील प्रक्रिया रखडली होती. बीड जिल्ह्यात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात यावरून वाद होते. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष आणि महानगरप्रमुखांची निवड करताना भाजपाने निष्ठावंतांना झुकते माप दिल्याचे दिसून आले आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूकर यांची महानगरप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आली आहे. ही निवड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मुळ (BJP) भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीनूसार नांदेड महानगरप्रमुख पदी अमर राजूरकर, परभणी-शिवाजी भरोसे, हिंगोली-गजानन घुगे, जालना- भास्करराव दानवे, जालना ग्रामीण-आमदार नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर (उत्तर)-सुहास शिरसाट, छत्रपती संभाजीनगर-पश्चिम संजय खंबायते तर धाराशीव येथे दत्ता कुलकर्णी यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महायुती स्थापन झाली तेव्हा इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपात इनकमिंग झाले होते. राज्य पातळीवर सत्तेमध्ये नव्याने आलेल्या पक्षातील लोकांना वाटा आणि मंत्री पदे द्यावी लागल्याने अनेक निष्ठावान नाराज झाल्याचे दिसून आले होते. (Marathwada) आता संघटनात्मक नियुकत्या आणि पदांचा विचार करताना तरी निष्ठावंतांचा प्राधान्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये राज्यातील नेते मंडळींनी हा समतोल बऱ्यापैकी साधला होता.
राजूकरांच्या नियुक्तीने अशोक चव्हाणांचे वर्चस्व कायम..
महानगरप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीतही निष्ठावंतांनाच झुकते माप दिल्याचे जाहीर झालेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी त्यांचे समर्थक आणि सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार अमर राजूरकर यांची वर्णी लावत आगामी महापालिका निवडणुकीची सुत्रे आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. तिकडे परभणीमध्ये आधीचे महानगरप्रमुख आनंद भरोसे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्याच सख्या भावाला या पदावर नियुक्ती देत धक्का दिला आहे.
जालन्यात दानवेंचा वरचष्मा..
जालन्यामध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले बंधू भास्कर दानवे यांची महानगरप्रमुख पदावर वर्णी लावत जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवली आहे. जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची नियुक्ती आश्चर्यकारक वाटते. आमदार असताना पुन्हा त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी का देण्यात आली? याबद्दल उत्सूकता आहे. कुचे हे देखील रावसाहेब दानवे यांचेच समर्थक असल्याने जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये रावसाहेब दानवे यांचा वरचष्मा दिसून येतो. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाट्याला काहीच आले नाही, असे म्हणावे लागेल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उत्तर, पश्चिममधील नियुकत्या पाहता इथे अनुक्रमे सुहास शिरसाट,संजय खंबायते यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांशी चांगले संबंध असलेले हे दोन्ही पदाधिकारी आहेत. हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर माजी आमदार गजानन घुगे यांना नियुक्त करून त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.