Latur Politics News : कट्टर काँग्रेसी घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपामध्ये प्रवेश केला. सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांची हयात काँग्रेस पक्षात गेली असताना त्यांच्या सुनबाईंनी भाजपात जाणे अनेकांना रुचले नाही.
परंतु या मागे लातूर जिल्हा आणि त्यालाच लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बहुसंख्य लिंगायत समाज आणि तेथील मतदार हे प्रमुख कारण होते. काँग्रेसकडे असलेला हा मतदार भाजपाकडे वळवण्यासाठी दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातलाच सदस्य पक्षात घेतला. 2024 मध्ये पक्षाने लातूर शहरमधून अर्चना पाटील यांना विधानसभेची उमेदवारीही दिली. पण त्यांचा अवघ्या साडेसहा हजार मतांनी पराभव झाला. विद्यमान काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना पाटील यांनी चांगलाच घाम फोडला होता.
दोन वर्ष पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. या निवडणुकीत पक्षाला संमिश्र यश मिळाले. आता भाजपाने अर्चना पाटील यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेत त्यांचा सन्मान केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष पदी अर्चना पाटील यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्चना पाटील आमच्या पक्षात येत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवराज पाटील यांचा एक मोठा वारसा आहे. अर्चना तो वारसा घेऊन त्या आल्या आहेत. यामुळे पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील भाजपामधील अंतर्गत गटबाजीतून अर्चना पाटील यांना काहीसा विरोधही सहन करावा लागला होता. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर अर्चना पाटील चाकूरकर या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत सक्रीय झाल्या होत्या. आता पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संघटना वाढीची जबाबदारी सोपवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.