Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : 'दुसऱ्यांच्या मेळाव्यानं परंपरा संपत नाही'; धनंजय मुंडे म्हणाले, 'तुम्ही समजून घ्या, संपला विषय'

Pradeep Pendhare

Beed News : बीडमधील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजपच्या नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात, त्यांचे मोठे बंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केले. ते तब्बल 12 वर्षानंतर दसरा मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यामुळे ते काय बोलतात, याकडं लक्ष लागलं होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध दसरा मेळाव्याची यादी सांगताना, काहींच्या दसऱ्या मेळाव्याविषयी आनंद व्यक्त केला. कोणी दुसऱ्यानं मेळावा घेतल्यानं परंपरा संपत नाही. दसरा त्याला माहीत आहे, त्याला प्रभू रामचंद्र माहीत असले पाहिजे. प्रभू रामचंद्रांशिवाय या दसऱ्याचं महत्त्व आहे का? या पुढचं मी काय बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या. संपला विषय", असं धनंजय मुंडे यांनी म्हणताच, समुदायानं जोरदार जल्लोष केला.

पंकजांचा उल्लेख, 'ये माझी लाडके..'

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांनी भाषणाची सुरवात 'अमर रहे, अमर रहे, मुंडेसाहेब अमर रहे', या घोषणेनं केली. धनंजय मुंडे म्हणाले, "ताई आज एवढं भारावून गेलो... ये माझी लाडके.., आज खरंच खूप भारावून गेलो आहे. 12 वर्षांच्या, एका तपानंतर दसऱ्या मेळाव्याला आलो आहे. या पवित्र दसरा मेळाव्याची आगळी-वेगळी परंपरा आणि ही आगळी-वेगळी परंपरा, माझ्या सगळ्या पिढीला लक्षात आली पाहिजे".

भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे, दसरा मेळावा. संत भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन हा दसरा मेळावा सुरू व्हायचा. ही पवित्र परंपरा मुंडेसाहेबांनी चालवली. त्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताई चालवत आहे. त्याचा मला अभिमान आहे. 12 वर्षाचा प्रारब्ध मी भोगला, त्यांनी भोगला. तो प्रारब्ध आता संपला. राजकारण, निवडणूक यापलीकडे, विचाराचा, भक्तीचा, शक्तीचा, स्वर्गीय मुंडेसाहेबांचा परंपरेचा हा 'शक्ती-भक्ती' दसरा मेळावा आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हंटले.

राज्य एका जातीसाठी नव्हतं

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, "आपलं प्रत्येकाचं जीवन संघर्षातून गेलं आहे. मुंडेसाहेबांचा संघर्ष स्वतःसाठी नव्हता. पंकजाताईंचा संघर्ष स्वतःसाठी नव्हता. आमचा संघर्ष मायबाप जनतेसाठी होता. मुंडेसाहेबांच्या संघर्षांच्या काळातील लढाई, पंकजाताईंनी सुरू ठेवलीय. आता या लढाईत ताईंच्यामागे एक होऊन उभं राहयचं आहे". महतं, संत, महापुरूषांनी कधी जातपात, धर्मांसाठी काम केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींबरोबर घेऊन राज्य उभं केलं. ते राज्य एका जातीसाठी नव्हतं. अठरा पगड जातीसाठी होतं. संत भगवानबाबांनी देखील अध्यात्म कोणत्या एका जातीसाठी नाही, ही शिकवण दिली आहे. या समुदायात देखील सर्व जाती-धर्माची लोकं आहेत, असं मंत्री मुंडे यांनी ठणकावून सांगितलं.

संघर्ष जिंकतो...

भगवान गडाच्या भूमिपुजनाची आठवण सांगताना मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आलं होते. यशवंतराव चव्हाणांनी भगवानगड हे नावं दिलं. या गडाला संघर्ष, भक्ताला संघर्ष, मुंडेसाहेबांचा संघर्ष, पंकजाताईंच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष, तुमच्या नशिबात संघर्ष, परंतु संघर्ष जिंकतच आलाय. हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे, असे सांगितलं.

तुम्ही समजून घ्या, संपला विषय!

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील दसरा मेळाव्याची परंपरा सांगताना काहींचे नाव न घेता समजायंच, ते समजावून घ्या, असा सूचक इशारा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा आजही गाजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होता. बीड जिल्ह्यात संत भगवान गडावर होत असलेला दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मला काही जणांनी प्रश्न विचारले, म्हटलं आनंद आहे. कारण दसरा का असावा? हा हिंदू धर्मातला सर्वात मोठं सण आहे. दसरा त्याला माहीत आहे, त्याला प्रभू रामचंद्र माहीत असले पाहिजे. प्रभू रामचंद्रांशिवाय या दसऱ्याचं महत्त्व आहे का? या पुढचं मी काय बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या. संपला विषय. असं म्हणत सभेसमोर धनंजय मुंडे नतमस्तक झाले.

दसरा मेळाव्याचा विचार, मनात सुद्धा...

12 वर्षांच्या, एक तपानंतर मी माझ्या बहिणीमागे गंभीरपणे उभा आहे. ताई तुम्ही अनेक संघर्षातून परंपरा जपली. ठेवा जपलात. सोबत भाऊ आहे की नाही, हे देखील पंकजाताईंने पाहिलं नाही. पण एक प्रामाणिकपणे सांगतो, भलं कधी माझं 12 वर्ष जमलं नाही, पण त्या काळात मनात सुद्धा आणलं नाही की, आपण दसरा मेळावा घ्यायचं. जो वारसा दिला आहे, त्यानं तो पुढं नेला. मला आनंद होतोय. माझ्या पंकजाताईला जेवढा आनंद होतोय, त्यापेक्षा जास्त आनंद समुदायात पाहतोय. या समुदाय एकसंघ झाला, तर एखाद्याने दुसरा मेळावा घेऊन, त्याची पवित्रा संपत नाही. संघर्ष पाचवीला पुजला आहे. संघर्षांच्या काळात एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

जब जब मैं बिखरा हूँ

'पवित्र दसऱ्यामेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. म्हणून जास्त करत नाही. दोन्ही हात वर करून मुठी वळवा, आपण या संघर्षात आपण एक आहोत, असं समुदायाकडून वधवून घेतलं. अन् “तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ”' असा शेर सुनावत, धनंजय मुंडे यांनी भाषण संपवलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT