Suresh Dhas  Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas News : सुरेश धसांचे खाडेंना खुले आव्हान; चौकशीच होऊन जाऊ द्या!

Maharashtra Politics : अटकपूर्व जामिनाला आपण विरोध करू नये, म्हणूनच आपल्या वाहनाचा पाठलाग केल्याचे तक्रारीत राम खाडे यांनी म्हटले आहे.

Datta Deshmukh

Beed: देवस्थान जमिनींच्या बेकायदा हस्तांतराच्या प्रकरणात न्यायालयात तक्रार दाखल करणाऱ्या राम खाडे यांनी भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार केली. यावर सुरेश धस यांनीही प्रतिहल्ला चढवला आहे. "या प्रकरणाची चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान देत तक्रार खोटी निघाली तर खाडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा," अशी मागणीही धस यांनी केली.

राम खाडे यांनी पोलिस अधीक्षकांना तक्रार देत आपण रात्रीच्या प्रवासाला निघाल्यानंतर धस यांच्या बंगल्यातून निघालेल्या जीपने आपला अंभोरा (ता. आष्टी), अहमदनगर ते सुपापर्यंत पाठलाग केला. या प्रकरणात कोणत्या आरोपींना अटक केले जाणार हे त्यांना अगोदरच समजत असून, या प्रकरणी वकिलांना मॅनेज करण्याचा व आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही राम खाडे यांनी केला. या प्रकरणातील सर्व आरोपी उच्चभ्रू असून, त्यांच्या अटकपूर्व जामिनाला आपण विरोध करू नये म्हणूनच आपल्या वाहनाचा पाठलाग केल्याचे तक्रारीत राम खाडे यांनी म्हटले आहे.

विनाकारण बदनामी...

आपण अंभोरा पोलिस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक ढाकणे यांना पाठलागाबाबत कळविल्यानंतर त्यांनी मदतीला पेट्रोलिंग वाहन पाठविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारीत त्यांनी पाठलाग करणाऱ्यांची नावेही घेतली ते देवस्थानचे पदाधिकारी व जमीन हस्तांतरात सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी करत जिवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या आरोपावर सुरेश धस यांनीही प्रतिहल्ला चढवत या प्रकाराची चौकशी होऊनच जाऊ द्या, तसेच तक्रार खोटी निघाली तर राम खाडे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सुरेश धस यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. देवस्थान जमीन हस्तांतर प्रकरणाशी आपला आणि कुटुंबीयांचा काहीही संबंध नसताना राम खाडेविरोधी पक्षातील नेत्यांचे ऐकून आपली विनाकारण बदनामी करत असल्याचे धस म्हणाले.

राम खाडेवर गुन्हा नोंदवा...

३० वर्षांच्या राजकारणात तीन वेळा विधानसभा व एक वेळा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी राम खाडे सातत्याने प्रयत्नशील असतात. खाडे यांनी आरोप केलेले वाहन खरोखरच त्या दिवशी माझ्या घरातून येऊन गेले का, वाहनात कोण होते या सर्व बाबींची चौकशीची मागणीही सुरेश धस यांनी केली. पोलिस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना सांगून या प्रकारची चौकशी करून कपोकल्पित तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यास बदनामी करणाऱ्या राम खाडेवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी धस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT