ashok Chavan, pratap chikhlikar  Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News: नांदेडमध्ये शत-प्रतिशत भाजप की अशोक चव्हाण ?

Laxmikant Mule

Nanded News : काही राजकीय नेते असे असतात, त्यांच्यासाठी पक्षापेक्षा वैयक्तिक ताकद आणि वर्चस्व महत्त्वाचे असते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यापैकीच एक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले. नांदेडसह, मराठवाड्यात शत-प्रतिशत भाजपचा शब्द त्यांनी म्हणे राज्य आणि दिल्लीतील बड्या नेत्यांना दिला.

राज्यसभेवर खासदारकी मिळवल्यानंतर जिल्ह्यात परतल्यापासून त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला यांचे दररोज प्रवेश सोहळे सुरू आहेत. आता या रांगा शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी आहेत, की मग भाजपमध्ये आपले स्थान आणि वर्चस्व टिकवण्यासाठी, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघ व 48 विधानसभा मतदारसंघांचे राजकीय गणित सोडवणे सोपे जावे, यासाठी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. (Nanded BJP News )

काँग्रेस सोडण्याचे बक्षीस म्हणून चोवीस तासांत चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. पक्ष प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी युद्ध पातळीवर त्यांनी मोहीमही हाती घेतली. आपल्या समर्थकांच्या हाती कमळ दिले, ‌पण हे सर्व होत असताना जुने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुठं गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अशोक चव्हाणांची भाजप आणि जुन्या निष्ठावंतांची दुसरी भाजप असे दोन गट असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसमध्ये असताना नांदेडचे कारभारी म्हणून सुमारे चार दशके चव्हाण यांनी काम पाहिले. ते दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार याच पक्षाकडून झाले. तसेच विविध विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे साहजिकच नांदेडच्या राजकारणात चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय जनता पक्षाला अलीकडच्या काळात विधानसभा व लोकसभेत यश मिळाले आहे. भाजपमध्ये चव्हाणांची एन्ट्री झाली आणि सारे चित्रच बदलले आहे.

त्यांनी आपल्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपत आणल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे अशोक चव्हाण हेच पक्षात शत-प्रतिशत होत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. नांदेड विमानतळावर दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेत राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल आभारही मानले. मोदींनी ही तितकाच सकारात्मक प्रतिसाद चव्हाणांना दिला. संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेतही पहिल्यांदा अशोक चव्हाण यांना भाषण करण्याची संधी मिळाली.

चव्हाणांची अजगर मिठी ?

मराठवाड्याच्या राजकारणात व‌ विकासात दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनी नांदेड व‌ मराठवाड्यातील राजकारणात जम बसवला. याचा फायदा भाजपला होईल, पण हे होत असताना निर्णय प्रक्रियेत शत-प्रतिशत अशोक चव्हाण होण्याची भीती जुन्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. नांदेड शहरात पार पडलेल्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अशोक चव्हाण तुम्ही अजगराएवढे मोठे व्हाल, असे विधान करत निष्ठावंतांच्या मनातील भीती बोलून दाखवली होती.

पण त्यांची ही भीती प्रत्यक्षात खरी ठरू पाहत आहे. नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे चित्र पाहता जुने व निष्ठावंत कार्यकर्ते शोधावे लागत आहेत. जिल्ह्याच्या भाजपमध्ये अशोक चव्हाण यांचा एक आणि दुसरा चिखलीकर व इतर निष्ठावंतांचा गट असे सरळ दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व सूत्रं इतर पक्षातून भाजपत आलेल्या नेत्यांकडे आली आहेत. ज्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून निष्ठेने काम केले ते मात्र मागे पडत आहेत.

शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आटापिटा करून अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षात (Bjp) प्रवेश दिला. मात्र, शत-प्रतिशत भाजपऐवजी जिल्हा शत-प्रतिशत अशोक चव्हाण होतो की काय? अशी भीती जुन्या आणि निष्ठावंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. खासदार गोपछडे (Ajit Gopchade) यांनी अशोक चव्हाणांचे (Ashok Chavan) केलेले वर्णन खरे ठरू पाहते की काय? चव्हाणांची अजगर मिठी निष्ठावंतांना येणाऱ्या काळात गिळंकृत करणार का? असा सवालही यानिमित्ताने केला जातोय.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT