Marathwada : भाजपच्या मिशन लोकसभेचा मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत फज्जा उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती, स्थानिक नेत्यांमधील समन्यवयाचा अभाव आणि नेत्यांची रटाळ, लांबलेली भाषणं यामुळे लोक सभा सोडून निघून गेले. या फ्लाॅप सभेमुळे सध्या जिल्ह्यातील (Bjp) भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे उद्धवसनेनेनेही भाजपला डिवचायला सुरूवात केली आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घ्यावी, ती ठाकरेंनीच. ऐड्यागबाळ्याचे ते काम नाही, असा टोला ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून भाजपला लगावण्यात येते आहे. सोशल मिडियावर देखील नड्डांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्याचीच चर्चा कालपासून सुरू आहे. (Aurangabad) औरंगाबाद लोकसभा लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला सभेसाठी गर्दी जमवता आली नसल्याने विरोधक विशेषतः उद्धव गट जोमात आहे.
गेल्या ३० वर्षापासून या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून येत होता. २०१९ चा अपवाद सोडला तर शिवसेनेने या मतदारसंघावर असलेला भगवा कधी खाली उतरू दिला नव्हता. पण गेल्या निवडणुकीत झालेला पराभव आणि राज्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडलेली फूट पाहता भाजपने इथे जोर लावायला सुरूवात केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी भाजपची चाचपणी सुरू असतांनाच त्यांना अपशुकन झाला असेच म्हणावे लागेल.
लोकसभेला भाजपकडून उमेदवार कोण असेल? याची चर्चा जेव्हा केली जाते तेव्हा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांचेच एकमेव नाव समोर येते. पंरतु ते केंद्रात मंत्री असले तरी त्यांच्या जिल्ह्यातील संपर्क पाहता भाजपलाच त्यांच्या विजयाची शाश्वती नाही. तर शिंदे गटाला हा लोकसभा मतदारसंघ देण्याची त्यांची इच्छा नाही.
त्यामुळे मिशन लोकसभा म्हणून सभा तर घेतली पण उमेदवार कोण? असेल हे भाजपचे पदाधिकारीच निश्चितपणे सांगू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव गट फार्मात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा लढवायला चालले पण उमेदवार नसतांना बेडक्या फुगवण्याचा हा प्रकार असल्याचा टोला लगावला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेला जेमतेम ५ हजारांची गर्दी जमवू शकलेल्या भाजपला या मतदारसंघात विजय मिळवणे वाटते तितके सोपे नाही, एवढे मात्र निश्चित.
मिशन भाजपची सभा फेल गेल्यानंतर सोशल मिडियावर भाजप विरुद्ध उद्धवसेना यांच्यात वाॅर सुरू झाले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला भाजपच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती हे दाखवणारे फोटो व्हायरल केले जात आहेत. एकंदरित फ्लाॅप सभेमुळे भाजपचे नेते कोमात तर विरोधक जोमात अशी परिस्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.