Dr.Karad-Khaire News, Aurangabad
Dr.Karad-Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Bjp News : पंकजा मुंडेंना ऑफर देणाऱ्या खैरेंनाच भाजपमध्ये येण्याची गळ..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political : राज्याच्या राजकारणात सध्या ऑफर ऑफरचा खेळ सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना नुकतीच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. यावरून चर्चा सुरू असातंनाच आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना तिळगुळ भरवतांना (Bjp)भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनीच खैरेंना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी आयोजित तिळगुळ कार्यक्रमात `तिळगुळ घ्या, खासदार व्हा आणि भाजपमध्ये या`. अशी खुली ऑफर (Dr.Bhagawt Karad) कराडांनी खैरेंना दिली. यावर ` मी खासदार तर होणारच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) शिवसेनेचाच` असा बाणा देखील खैरेंनी दाखवला. या ऑफरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

राज्यात आणि जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष एकत्र असलेले शिवसेना-भाजप हे मित्रपक्ष आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. शिंदे यांच्या बंडाला हवा देत पक्ष फोडल्यापासून तर जिल्ह्यातील शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. असे असले तरी आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने का होईना हे सगळे एकत्र आले आणि एकमेकांना तिळगुळ भरवत काही क्षणासाठी का होईना, पण कटुता विसरले हे ही नसे थोडके असेच म्हणावे लागेल.

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा कायम होत असतात. यावर दोन दिवसांपुर्वी चंद्रकांत खैरे यांनी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यावर खरचं अन्याय होत असल्याचे म्हणत त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. तत्पुर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आमच्यासोबत या ओबीसी आणि मुस्लिमांची ताकद मिळून राज्यात वेगळे समीकरण निर्माण करू, असे म्हणत साद घातली होती.

या ऑफरकडे पंकजा मुंडे या फारसं गांभीर्याने पाहत नसल्या तरी त्यांच्याबाबतीत अशा चर्चा नेहमी होत असतात. खैरेंनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देवून दोन दिवस उलटत नाही, तोच राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांनी खैरेंनाच भाजपमध्ये येण्याची ऑफर देवून टाकली. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT