Subhash Desai-Astikkumar Pandey Sarkarnama
मराठवाडा

भाजप म्हणते पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; पुरावे द्या, नाहीतर माफी मागा शिवसेनेचे आव्हान

(Aurangabad Municipal Corporation)प्रशासकांच्या धमकीमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, सर्वसामान्य नागिरक देखील बिथरले आहेत. यातून जर काही अघडीत घडले तर त्याला देसाई, पांडेय जबाबदार असतील.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः आगामी महानगरपालिकेत शहरातील गुंठेवारीचा प्रश्न हा सत्ताधारी शिवसेना आणि आता स्वतंत्र लढण्याच्या तयारी असलेल्या भाजपच्या `गले की हड्डी`. ठरण्याची शक्यता आहे. मालमत्ता कराची थकलेली वसुली, त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्त्तिककुमार पांडेय यांनी ऐनदिवाळीच्या तोंडावर एक फर्मान काढले.

गुठेवारी भागातील रहिवाशी आणि व्यावसायिक वापराच्या इमारती नियमित करून घेण्यासाठी राज्य सरकारने एक योजना जाहीर केली. या अंतर्गत मालमत्ता नियमित करून घ्या, नाहीतर घरांवर बुलडोझर फिरवतो, असा दम पांडेय यांनी भरला. यामागे मालमत्ता कराची वसुली वाढावी, गुंठेवारीतील मालमत्ता नियमित होऊन त्यांना सुविधा पुरवल्या जावा असा उद्दात हेतू त्यांचा होता असे मानायला हकरत नाही.

पण त्यांच्या या धमकी वजा इशाऱ्यांना महापालिकेत सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या शिवसेना-भाजपला चांगलाच घाम फुटला. महापालिकेच्या तोंडावर महापालिका प्रशासकांचे हे फर्मान निवडणुकीत चांगलेच महागात पडू शकते हे लक्षात आल्यावर दबक्या आवाजात का होईना पण शिवसेनेने त्याला विरोध सुरू केला.

आस्त्तिककुमार पांडेय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतले अधिकारी. अगदी औरंगाबाद दौऱ्यावर दोन्ही ठाकरेंनी पांडेय यांच्या घरी जाऊन चहापान केले होते. त्यामुळे पांडेय यांच्या विरोधात कुणी जाण्याची हिंमत दाखवणार नाही. पालकमंत्री सुभाष देसाई यांचा वरदहस्त पांडेय यांच्यावर असल्यामुळे गुंठेवारीच्या मुद्यावरून पेटलेले रान शांत कसे करावे असा प्रश्न स्थानिक नेत्यांना सतावत होता.

अखेर याचे फायदे तोटे वरिष्ठांना समजवून सांगितल्यानंतर अखेर देसाई यांनी पांडेय यांच्या बुलडोझरला ब्रेक लावला. हा ब्रेक लावतांना व्यावसायिकांनी दिवाळीनंतर आपल्या मालमत्ता नियमित करून घ्याव्यात, असेही स्पष्ट केले. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेले अशी चर्चा सध्या सुरू आहे.

महापालिकेच्या सत्तेत पंचवीस वर्ष सोबत घालवलेल्या भाजपने याचे राजकीय भांडवल करण्याची संधी अचूक हेरली. पालकमंत्री सुभाष देसाई हे वसुलीमंत्री आहेत आणि महापालिकेचे प्रशासक पांडेय हे शिवसेनेचे व्यवस्थापक असा, घणाघात भाजपने पत्रकार परिषद घेऊन केला. एवढ्यावरच न थांबता पालकमंत्री देसाई यांच्यासह पांडेय यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवदेन देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसा आयुक्तांना देण्यात आले.

पालकमंत्री व मनपा प्रशासकांच्या धमकीमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, सर्वसामान्य नागिरक देखील बिथरले आहेत. यातून जर काही अघडीत घडले तर त्याला देसाई, पांडेय जबाबदार असतील, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या खेळीला शिवसेनेने आता जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे.

विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेवर वसुलीचे आरोप करणाऱ्या भाजपने पुरावे सादर करावेत, किंवा माफी मागावी, असा आक्रमक पावित्रा आता शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत या गुंठेवारीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप या दोन पक्षात चांगलेच वाॅर भडकणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT