Bjp State President Chandrakant Patil-Vijay Warpudkar Sarkarnama
मराठवाडा

आता पुन्हा फसवणूक करून घेणार नाही; भाजप सगळ्या निवडणूका स्वबळावरच लढणार!

(Bjp State President Chandrakant Patil)यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीलाच राजकीय भवितव्य आहे. एकेका नेत्यांच्या मालकीच्या पक्षांमध्ये भविष्यात काय होणार असा प्रश्न आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपा आता राज्यात सर्वच निवडणुका एकट्याने लढवेल, कोणासोबत जाऊन फसवणूक करून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील काॅंग्रेसचे नेते विजय वरपुडकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मराठवाडा संघटनमंत्री संजय कोडगे, माजी आमदार मोहन फड, परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक कार्य चांगले असले तरी निवडणुकांमध्ये युतीमुळे शिवसेनेला संधी मिळत गेली. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात भाजपा कमकुवत राहिली. आता भाजपा परभणीमध्ये स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार असून पक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रभावी ठरेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल.

आता महाराष्ट्रात भाजपा एकट्याने निवडणुका लढवेल. एखाद्या पक्षासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घ्यायची नाही. यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीलाच राजकीय भवितव्य आहे. एकेका नेत्यांच्या मालकीच्या पक्षांमध्ये भविष्यात काय होणार असा प्रश्न आहे. तथापि, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्याचे काम चालूच राहणार आहे.

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना आपण आश्वस्त करतो की, त्यांचा सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. परभणी जिल्ह्यात भाजपा बळकट करण्यासाठी आपण काम करू. जिल्ह्यात भाजपासाठी कार्यकर्ते जोडण्याचे काम आपल्याला करायचे, असल्याचे विजय वरपूडकर यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT