Shivsena Supremo Balasaheb Thackeray Sarkarnama
मराठवाडा

`तुमची कमतरता नेहमीच जाणवेल`भाजप अजूनही बाळासाहेब ठाकरेंना विसरलेली नाही

(Let. Shivsena Supremo Balasaheb Thackeray) भाजपच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांनी देखील बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन केले आहे.

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः राज्यातील सत्तांतरानंतर गेली २५ वर्ष एकमेकांच्या सोबत असलेल्या शिवसेना-भाजप या मित्रपक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट आले आहे. मुख्यमंत्री पदावरून निवडणुकीत एकत्र लढलेले एकच विचारधारा आणि हिंदुत्वाचा धागा असलेले पक्ष वेगळे झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे व सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. तेव्हापासून ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवले अशी टीका भाजपकडून सातत्याने केली गेली.

अजूनही ती सूरूच आहे, पण भाजपला अजूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आज १७ नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. या निमित्ताने राज्यातील जवळपास सगळ्या भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेबांची आठवण काढत त्यांना अभिवादन केले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर या सगळ्यांनीच सोशल मिडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांची आठवण काढत त्यांना अभिवादन केले.

राज्यातील राजकीय परिस्थिती, केंद्र आणि महाराष्ट्र असा सुरू झालेला वाद, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगलेला कलगितुरा आणि कालच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेनेशी आता पुन्हा युती होणे नाही, असा केलेला निर्धार या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेबांची आठवण काढणे हे ही नसे थोडके.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली तेव्हापासूनच भाजपकडून शिवसेनेवर सत्तेसाठी हिंदुत्व सोडले अशी टीका केली गेली. तर २५ वर्ष आमची भाजप सोबतच्या युतीत सडली, असा प्रतिहल्ला शिवसेनेकडून केला गेला. बारामतीत तर भाजपला टोला लगावतांना आम्ही इतकी वर्ष वेगळीच अंडी उबवली, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते.

इकडे राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे शीतयुद्ध सुरू असतांना तिकडे केंद्रातील ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करत शिवसेनेसह राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या नेत्यांना त्रास देण्याचे धोरण राबवले गेले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून शिवसेनेला सातत्याने आता बाळासाहेबांची पुर्वीची शिवसेना राहीली नाही, सत्तेसाठी लाचार झाले, असे टोमणे लगावले जातात.

एकीकडे विरोधक म्हणून हा हल्ला चढवत असतांनाच भाजपच्या नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आजही आपल्यासाठी पितृतुल्य व आदरणीय असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांनी देखील बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन केले आहे. `तुमची कमतरता नेहमीच जाणवेल`, असा उल्लेख देखील काही नेत्यांनी आपल्या अभिवादनातून केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT