BJP in Marathwada Sarkarnama
मराठवाडा

BJP in Marathwada : महायुतीत भाजपला सर्वाधिक फटका, मराठवाड्यात पाटी झाली कोरी...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 11 June : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मराठवाड्यात त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्याच्या सत्तेत सर्वात मोठा पक्ष आणि 105 आमदार पाठीशी असतानाही भाजपला मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं. फडणवीस यांना सत्तेत उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने भाजपचे पदाधिकारी कमालीचे नाराज होते. पण ही नाराजी कधी बाहेर आली नाही.

राज्यातील महायुतीचा लोकसभा निवडणुकीत पुरेपूर फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण मराठा आरक्षण, संविधान बदलणार असा विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा फटका महायुतीला बसला. महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली, पण याचा सर्वाधिक फटका बसला तो भाजपला. मराठवाड्याचा विचार केला तर भाजपचा एकही खासदार इथे निवडून आलेला नाही.

भाजपने (BJP) जालना, बीड, लातूर, नांदेड या 4 लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. तर परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरला सोडून तिथेही आपलेच वर्चस्व कसे कायम राहिल, याची व्यवस्था केली होती. पण मराठा आरक्षण (Maratha Reservation) व त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे भाजपला चांगलेच महागात पडले.

रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे, महादेव जानकर हे सगळेच उमेदवार निवडणुकीत पडले. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेव महायुतीचा तोही शिवसेनेचा खासदार निवडून आला. विशेष म्हणजे संभाजीनगर मतदारसंघातून लढण्याची तयारी भाजपने दीड ते दोन वर्षापासून सुरू केली होती.

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संभाव्य उमेदवार म्हणून या मतदारसंघात तन-मन-धनाने जोर लावला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संभाजीनगरच्या जागेवर अडून बसले आणि भाजपच्या नेत्यांना माघार घ्यावी लागली. केवळ माघार घ्यावी लागली नाही, तर जी बुथ स्थरापर्यंतची यंत्रणा भाजपने तयार केली होती, ती शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्यासाठी राबवावी लागली.

त्यामुळे संदीपान भुमरे यांची लॉटरी लागली आणि ते अनपेक्षितपणे 1 लाख 35 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. जागा न मिळाल्याचे आणि मराठवाड्यात एकही भाजपचा खासदार नसल्याचे शल्य भाजपच्या नेत्यांना बोचतं आहे. यातून आता कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे.

पालकमंत्री पदावर दावा

संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दावा केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे भुमरे खासदार झाले. त्याचे बक्षिस म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला म्हणजेच अतुल सावे यांना संभाजीनगरचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे पश्चिमचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट हे या पदासाठी इच्छुक आहेत. भुमरेंच्या वाट्याचे मंत्री व पालकमंत्रीपद हे सहाजिकच शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. असे असतांना भाजपने यात मोडता घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात एकही खासदार निवडून आला नाही, केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे पराभूत झाले, तर नव्या मंत्रीमंडळातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राहिलेल्या डॉ. भागवत कराड यांना डिच्चू मिळाला.

या सगळ्या गोष्टीमुळे भाजप जिल्ह्यात आणि मराठवाड्यातही बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. भाजपच्या मदतीने शिवसेनेचा खासदार झाला हा दावा खरा असला तरी थेट शिवसेनेच्या वाट्याच्या पालकमंत्री पदावर भाजपने दावा सांगणे योग्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अतुल सावे हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत, शिवाय त्यांच्याकडे जालन्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे.

शिवसेनेकडे अब्दुल सत्तार यांचा पर्याय आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत मुख्यमंत्री संभाजीनगरचा पदभार सत्तार यांच्याकडेही सोपवू शकतात. भाजपच्या अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहेच. गिरीश महाजन सध्या लातूर, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. तेव्हा भाजपची अतिघाई त्यांना संकटात नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT