Anna Dhongade Politics  Sarkarnama
मराठवाडा

KCR Political News : केसीआर यांची पुन्हा महाराष्ट्रात एन्ट्री? बीआरएसचे नेते धोंडगे म्हणतात,'वेट अ‍ॅन्ड वाॅच...'

Laxmikant Mule

Nanded Political News : गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गुलाबी वादळ आले होते. या वादळाच्या मोहात राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते पडले. यापैकीच एक म्हणजे माजी आमदार, शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे. एक अभ्यासू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख. अशा व्यक्तीने राज्याती प्रस्थापित पक्षांचे राजकारण झुगारून शेजारच्या तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती बीआरएस पक्षावर विश्वास दाखवला.

त्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात एका भव्य मेळाव्याच्या माध्यमातून बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ मराठवाड्यासह राज्यातील इतर भागातून अनेक पक्षांच्या आजी, माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी बीआरएसची वाट धरली. सभा, मेळावे, अलिशान वाहनांचा ताफा असे एखाद्या चित्रपटात शोभून दिसावे असे गुलाबी चित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाले.

'अब की बार किसान सरकार' चा नारा देत टीम केसीआर (KCR) महाराष्ट्रातील सहकाऱ्यांसोबत सत्ता परिवर्तन आणि बीआरएसच्या राष्ट्रीय विस्ताराचे गुलाबी स्वप्न रंगवत होते. पण तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर चंद्रशेखर राव यांना झालेल्या अपघातामुळे सगळेच धुळीस मिळाले. लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) अवघ्या दोन महिन्यांवर आली असतांना राज्यातील बीआरएस पक्षामध्ये शांतता आहे.

नेते हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून आहेत. तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन तिथला पॅटर्न आणि योजना बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मंत्री, खासदार इकडे फिरकेना से झाले आहेत. लोकसभेच्या आखाड्यात राज्यामध्ये पुन्हा एकदा केसीआर यांची एन्ट्री होणार का, त्यांची जादू पुन्हा महाराष्ट्रात पाहायला मिळणार का असे एक ना अनेक सवाल बीआरएसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना पडू लागले आहेत. एकंदर सगळ्या परिस्थितीवर शंकर अण्णा धोंडगे यांनीही सध्या तरी काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मला काहीच विचारू नका, असा पावित्रा त्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील समन्वयक, बीआरएसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जणू अज्ञातवासात गेल्याचे चित्र सध्या आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची तब्येत आता सावरत आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ते महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक हैदराबादेत बोलावणार आहेत. तेव्हाच बीआरएस (BRS) लोकसभा लढवणार का? महाराष्ट्रात उमेदवार देण्याची त्यांची तयारी आहे का? किती जागा लढवायच्या? की मग लोकसभा न लढवता विधानसभेची तयारी करायची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या बैठकीनंतरच मिळण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT