Cabinet expansion News, Aurangabad
Cabinet expansion News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Cabinet expansion : शिरसाटांच्या मंत्रीपदाला मुहूर्त लागणार का ?

सरकारनामा ब्युरो

Sanjay Shirsat : राज्यातील सत्तातंरानंतर ९ आॅगस्ट २०२२ रोजी १८ मंत्र्यांचा शपतविधी पार पडला होता. तेव्हा (Aurangabad) औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना फोन करून मुंबईत बोलावण्यात आले होते. ज्याला मंत्रीपद त्यालाच फोन गेल्यामुळे शिरसाट कुटुंबासह आणि समर्थकांसह मुंबईत मुक्कामी दाखल झाले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत रंगलेल्या नाराजी नाट्यातून शिरसाटांना वेटींगवर ठेवण्यात आले होते.

तेव्हा पासून कधी नाराज, तर कधी आपल्या पक्षाच्या कार्यक्रमापासून अंतर राखत वारंवार नाराजी व्यक्त करणाऱ्या संजय शिरसाटांना आता तरी मंत्रीपद मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Shivsena) मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून सुरू होती. अनेकदा मुहूर्त सांगितले गेले पण ते साधले गेले नाही. आता (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी स्वतःच २० ते २२ जानेवारी दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

आता विस्ताराचा मुहूर्त सांगणाऱ्या शिरसाटांच्या मंत्रीपदाला मुहूर्त लागणार का? की एकाच जिल्ह्यात तिसरा मंत्री नको म्हणत पुन्हा शिरसाटांची संधी हुकणार? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघात आणणारे आमदार म्हणून संजय शिरसाट चर्चेत होते. जाहीर भाषणातून मी एकनाथ शिंदेचा लाडका आहे, म्हणून ते मला निधी देतात असे शिरसाट सांगायचे.

त्यामुळे जव्हा शिंदेंनी बंडाचे हत्यार उपसले तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावणारा शिलेदार म्हणून संजय शिरसाट यांचे नाव पुढे आले होते. मुंबई, सुरत, गुवाहाटी या सगळ्या प्रवासात शिरसाट केंद्रस्थानी होती. उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून टीका करणारे देखील ते पहिलेच आमदार ठरले होते. तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या शिरसाटांना शिंदे मंत्रीमंडळात नक्की स्थान देतील अशी खात्री होती. परंतु आश्चर्यकारकरित्या शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा पहिल्या टप्यात मोजक्याच मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय झाला.

शिंदे गटाच्या वाट्याला कमी मंत्रीपदे आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेकांना वेटिंगवर ठेवावे लागले त्यात शिरसाटांचाही नंबर होता. अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीमंडळ समावेशासाठी शिरसाटांना थांबण्यास सांगण्यात आले. सत्तारांमुळे आपली संधी हुकली याची सल अजूनही शिरसाटांच्या मनात आहे. आता मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख शिरसाट यांनी माध्यमांना सांगितल्यामुळे यावेळी तरी शिरसाटांना मंत्रीपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT