Bjp Leader Pankaja Munde News
Bjp Leader Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

मंत्रीमंडळ : पंकजा मुंडेंना डावलणे अवघडच

Dattatrya Deshmukh

बीड : ज्यावेळी पक्ष सत्तेच्या विरोधात असतो त्यावेळी पक्षातील विरोधकांना डावलणे, त्यांचे खच्चीकरण करणे सोपे असते. (Beed) मात्र, पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षातील ताकदीच्या नेत्यांना बाजूला ठेवणे कठीण असते. या समिकरणामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना या मंत्रीमंडळात डावलले जाणार नाही, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि भविष्यात विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पंकजा मुंडे यांची पक्षालाही तेवढीच गरज लागणार असल्याचे गणितही मांडले जात आहे. (Marathwada) मागच्या महायुती सरकारमध्ये मंत्री असताना पंकजा मुंडे यांचे विविध माध्यमांतून राजकीय खच्चीकरण करण्याचे पक्षांतर्गत प्रयत्न झाल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत परळीतल्या पराभवातही त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी हातभार लावल्याचा आरोपही कायम केला जातो. या पराभवानंतर त्यांना विधान परिषद, राज्यसभा व इतर ठिकाणी त्यांची वर्णी लागण्याची अपेक्षाही फोल ठरली. अगदी परवा झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारीची समर्थकांना मोठी अपेक्षा होती. मात्र, निराशाच झाल्याने समर्थक पुन्हा एकदा संतप्त झाले.

अगदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे वाहन आडविण्याचाही प्रयत्न केला. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे कमबॅक होण्याच्या आशा उंचावल्या आहेत. पुर्वी पंकजा मुंडे यांना डावलल्याने संताप व्यक्त करणाऱ्या समर्थकांनी आता देव - देवतांना साकडे घालणे सुरु केले आहे. कुणी त्यांच्या मंत्रीपदासाठी होम हवन करत आहे तर कोणी पायी दिंडी काढत आहे.

दरम्यान, आता त्या भाजपच्या मध्यप्रदेश सहप्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे केंद्रीय नेत्यांसोबत त्यांची उठबस सहाजिकच वाढलेली आहे. पक्ष विरोधात असताना पक्षांतर्गत विरोधकांना डावलणे सोपे असते. कारण, त्याचा राजकीय फटका फार बसत नाही. मात्र, पक्ष सत्तेत आल्यानंतर डावलणे कठीण असल्याच्या समिकरणानुसार पंकजा मुंडे यांना यावेळी मंत्रीमंडळात नक्की संधी भेटेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून भविष्यात विधानसभा निवडणुकांनाही पक्षाला सामोरे जायचे आहे. पंकजा मुंडे यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा तर आहेच. शिवाय त्या मासबेस लिडर असल्याने त्यांचा निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असे गणित मांडले जाते. त्यांना डावलण्याचे तोटे आगामी निवडणुकीत पक्षाला होऊ शकतात असाही अंदाज बांधला जात आहे. अलिकडे पंकजा मुंडे पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमांत अग्रभागी दिसत असल्याने या अंदाजाला अधिकच पुष्टी मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT