Aurangabad : भाजप हा पक्ष तुम्हाला गरजेपुरता वापरतो आणि नंतर फेकून देतो. जे गद्दार सध्या त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांना आता हे कळणार नाही. पण त्यांचा उपयोग जेव्हा संपेल तेव्हा त्यांची अवस्था फार वाईट असेल. बीजेपी हा युज अँड थ्रो करणारा पक्ष आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहा, असे आवाहन ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले. निष्ठावंतांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
श्रीरामाचा धनुष्यबाण गद्दारांचा कधीच होवू शकत नाही, अशी टीका देखील खैरे यांनी यावेळी केली. निवडणूक आयोगाने (Shivsena) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत राज्यभरात दौरे करण्याची घोषणा केली.
नाव आणि चिन्ह गेल्यानंतर औरंगाबादेत ठाकरे गटाच्या निष्ठावंतांचा पहिला मेळावा आज पार पडला. संत एकनाथ रंग मंदिरातील या मेळाव्याला गर्दी झाली होती. जुन्या आणि नव्या अशा निष्ठावंत शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खैरे यांनी भाजप व शिंदे गटावर टीका केली.
खैरे म्हणाले, शिंदे यांना बंड करायला लावून भाजप आणि फडणवीसांनी राज्यात जे काही केले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना किती यातना झाल्या असतील याचा विसर पडू देवू नका. जे सत्तेसाठी गद्दारी करून गेले, त्यांचा उपयोग जेव्हा संपेल तेव्हा त्यांना त्यांची खरी जागा आणि किमंत कळेल. भाजपने आतापर्यंत फक्त वापर करून सोडून देण्याचे धोरण ठेवले आहे.
जेव्हा या चाळीस गद्दारांचा उपयोग संपेल तेव्हा, त्यांना देखील बाजूला फेकले जाईल. कारण बीजेपी हा युज अँड थ्रो करणारा पक्ष आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आणि धनुष्यबाण जीवापाड जपला, देव्हाऱ्यात ठेवून पुजा केलेला धनुष्यबाण आज गद्दारांच्या हाती गेला आहे. पण रामाचा धनुष्यबाण गद्दारांचा कधीच होवू शकत नाही, त्यामुळे घाबरून जावू नका. आता आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोकेबाज गल्लोगल्ली फिरतील, त्यांच्यापासून सावध राहा.
राजकारणात नशिबाने मिळत असते, त्यामुळे आतापर्यंत कुणाला काय मिळाले? काय नाही ? याचा विचार करू नका. आपल्याला पेटून उठावे लागेल, येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत गद्दारांचा समाचार घ्यावा लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहा, असे आवाहन देखील खैरे यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.